राँग नंबरमुळे अॅसिड हल्ला पीडितेला मिळाला जीवनसाथी
By Admin | Published: May 24, 2017 12:42 PM2017-05-24T12:42:12+5:302017-05-24T14:50:14+5:30
दोघांची ही लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - 26 वर्षीय अॅसिड हल्ला पीडित ललिता बन्सीला साधी कल्पनाही नव्हती की एका राँग नंबरमुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल. या चुकीच्या क्रमांकामुळे आपल्या दरवाजात लग्नाची वरात येईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. 2012 साली अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिताने मंगळवारी आपल्या मिस्टर राईटसोबत लग्नगाठ बांधली. अत्यंत आनंदात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोघांची ही लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच आहे.
2012 मध्ये वैयक्तिक वादामुळे ललिताच्या चुलत भावांनी तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. हल्ला झाला तेव्हा ललिता 20 वर्षांची होती. त्यानंतर तिच्या चेह-यावर आतापर्यंत 17 शस्त्रक्रिया झाल्या असून, अद्याप 12 शस्त्रक्रिया बाकी आहेत. लग्नानंतर तिच्यावरील उपचार सुरु राहणार आहेत. ललिता उत्तरप्रदेशच्या आजमगढची रहिवासी आहे.
ललिता आणि राहुलच्या प्रेमप्रकरणाला राँग नंबर कारणीभूत ठरला. राहुलने चुकून ललिताचा नंबर डायल केला आणि त्यानंतर दोनच महिन्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 27 वर्षीय राहुल सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून काम करतो. "माझं लग्न होईल असा विचारही मी कधी केला नव्हता. राहुलला माझी परिस्थिती माहिती असतानाही तो लग्नासाठी तयार झाला आणि आपला निर्णय त्याने बदलला नाही", असं ललिता सांगते.
दुसरीकडे राहुलनेही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं आहे की, "तिचं मन एकदम साफ आहे, आणि माझ्यासाठी तेच जास्त महत्वाचं आहे. आपण काहीतरी वेगळं करावं असं मला सुरुवातीपासूनच वाटत होतं. मी काहीतरी योग्य आणि चांगलं करेन हे मला माहित होतं. माझी आई आणि कुटुंबाने मला नेहमी समर्थन दिलं आहे. एक राँग नंबर माझं आयुष्य बदलेलं याची मला साधी कल्पनाही नव्हती".
साहर फाऊंडेशन नावाची एनजीओ ललिताची काळजी घेत आहे. एनजीओने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटसृष्टीतील अनेकांनी ललितासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने ठाण्यात एक फ्लॅट भेट म्हणून दिला असून डिझायनर अबू जानी आणि संदिप खोसला यांनी तिला लग्नाची साडी आणि दागिने भेट म्हणून दिले. आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक उद्योजकांनी ललिताला मदत केली आहे.