सलग दोन लॉटरींमुळे महिला झाली लक्षाधीश, लंचब्रेकला असताना काढली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 06:50 PM2017-12-13T18:50:38+5:302017-12-13T19:03:19+5:30
ऑफीसमधून रोजच्या सवयीप्रमाणे जेवायला बाहेर पडल्यावर तिने अचानक लॉटरी विकत घेतली आणि त्यात ती चक्क जिंकली.
मॅरलँड : कोणाचं नशिब कधी पालटेल हे काही सांगता येत नाही. ऑफिसमध्ये गेलेली एक महिला घरी जाताना चक्क २ मिलिअन डॉलरची मालकीण होणं हे केवळ आपण स्वप्नातच पाहू शकतो. पण हे जर आपल्याबाबतीत खरं ठरलं तर नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेतल्या एका महिलेला असाच अनुभव आलाय.
एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणारी मागा फॉर्च्यून ही नेहमीप्रमाणे ऑफिसमधून दुपारसाठीच्या जेवणाला बाहेर निघाली. तिला लॉटरी काढायची भारीच हौस. त्यामुळे मॅरलँडमधील फ्रेडरिक काऊंटीच्या रस्त्यावर असलेल्या एका लॉटरी शॉपमधून तिनं ३० डॉलर देऊन लॉटरीचं तिकिट काढलं. हे तिकिट तिनं तिथेच स्क्रॅच केलं आणि क्षणार्धात ती २ मिलिअन डॉलरची मालकीण झाली. ती नेहमीच लॉटरी विकत घेत असे. पण प्रत्येकवेळी तिचा हिरमोड व्हायचा. पण यावेळेस काढलेल्या तिकिटामुळे तिचं नशिबच उजळलं. ती तशीच आनंदाच्या भरात ऑफिसमध्ये परतली. ऑफिसमध्ये तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. मात्र घरी गेल्यावर तिने ही गोष्ट सगळ्यात आधी आपल्या नवऱ्याला सांगितली. अचानकपणे पैशाचा लाभ झाल्याने तोही आश्चर्यचकित झाला.
आणखी वाचा - या भाग्यवान महिलेला तीन आठवड्यात तीनदा लागली लॉटरी
जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
आता आणखी धक्का आम्ही तुम्हाला देणार आहोत. या महिलेला ही पहिल्यांदाचा लागली नाही. याआधीही काही वर्षांपूर्वी तिला लॉटरी लागली होती. त्यावेळ जवळपास १ लाख डॉलरची लॉटरी लागली होती. त्यामुळे आता पुन्हा लॉटरी लागल्याने सगळेच अचंबित झाले आहेत. आयुष्यात एकदा लॉटरी लागू शकते पण असं दोन वेळा लॉटरी लागणं म्हणजे तिला भाग्यवानच म्हणायला हवं. पहिल्यांदा लॉटरी लागल्यानंतर बहुतेक या महिलेचा आत्मविश्वास दुणावला असेल आणि म्हणूनच ती पुन्हा लॉटरीचं तिकिट काढायला लागली असेल. अखेर तिच्या या प्रयत्नाला यश मिळालं. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने नशिबवान ठरलीय असंच सगळे म्हणताहेत. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आता मिळालेले पैसे ते भविष्यासाठी वाचवून ठेवणार आहेत. त्यांना आता दरवर्षी सगळे कर कापून ६६ हजार डॉलर मिळणार आहेत. तसंच, ज्या स्टोरमधून या महिलेने हे तिकिट खरेदी केलं त्यालाही बक्षिस मिळणार आहे. त्याला तब्बल २ हजार डॉलरचा बोनस मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय. आपण याआधीही एका महिलेला तीन आठवड्यात तीनवेळा लॉटरी लागलेली ऐकलेलं आहे. त्या महिलेला एकूण ५ मिलिअन डॉलरची लाटरी लागली होती.