ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 09:34 PM2018-06-15T21:34:15+5:302018-06-15T21:34:15+5:30

घोडा घेऊन आलेल्या अभियंत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

software engineer rides a horse to office on last day of work | ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा

ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा

Next

Techie rides a horse to office on last day of work
बंगळुरु: ऑफिस सोडताना, तिथल्या माणसांचा निरोप घेताना काहीजण भावूक होतात. निरोपाचं दु:ख आणि त्याचवेळी नव्या संधीचा आनंद अशा काहीशा संमिश्र भावना शेवटच्या दिवशी मनात असतात. मात्र बंगळुरुतील एका अभियंत्याचा ऑफिसमधील शेवटचा दिवस यापेक्षा वेगळा ठरला. कारण हा अभियंता शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला आला. सध्या या अभियंत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

बंगळुरुतील रिंग रोड परिसरात गुरुवारी एक तरुण घोड्यावरुन ऑफिसला जात होता. या तरुणाचं नाव रुपेश कुमार वर्मा असं असल्याची माहिती बंगळुरुतील एका वृत्तपत्रानं दिली आहे. रुपेश ऍम्बेसी गोल्फ लिंक्समध्ये काम करायचा. 'सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ऑफिसमधील शेवटचा दिवस' असा मेसेज रुपेशनं घोड्यावर लावला होता. रुपेश सकाळी 7 वाजता त्याच्या घरातून ऑफिसला जायला निघाला होता. मात्र शहरातील वाहतूक कोंडी आणि घोड्यानं अधूनमधून घेतलेली विश्रांती यामुळे तो दुपारी 2 वाजता ऑफिसला पोहोचला. 

रुपेश कुमार वर्माचे घोड्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर एका वृत्तपत्रानं त्याच्याशी संवाद साधला. मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेल्या रुपेशला नोकरीचा कंटाळा आल्यानं त्यानं राजीनामा दिला. 'सॉफ्टवेअर अभियंते म्हणून आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित जटिल समस्या सोडवतो. मग हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करु शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यानं मी नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरू करण्याचा माझा विचार आहे,' असं रुपेशनं सांगितलं. रुपेश घोड्यावर बसून आल्यानं त्याला कंपनीच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आलं होतं. मात्र घोडादेखील प्रवासाचं साधन आहे, असं म्हणत रुपेश थेट घोड्याला घेऊन कंपनीच्या कॅम्पसमध्ये शिरला. 
 

Web Title: software engineer rides a horse to office on last day of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.