डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 05:17 PM2017-12-07T17:17:04+5:302017-12-07T17:23:35+5:30
डुकराच्या पोटातून सापडलेल्या या दगडाने त्या खेडूताला अचानक पैसा मिळवून दिला. तो माणूस आता कोटींचा मालक आहे.
चीन : कोणाचं नशिब कसं आणि कधी पालटेल हे काही सांगता येणार नाही. चीनच्या एका खेडेगावात एका माणसाला असा एक दगड सापडला आहे ज्यामुळे तो इसम आता करोडपती बनणार आहे. आपल्या गोठ्यात मिळणारा एक साधा वाटणारा दगड आपल्याला करोडपती बनवू शकतो यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही बातमी वाचाच.
डेक्कन क्रोनिकल या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या ग्रामीण भागात राहणारे बो चुंलोऊ यांना त्यांच्या गोठ्यात एक दगड सापडला. हा दगड इतर दगडांपेक्षा निराळा दिसत होता. त्यामुळे नक्कीच हा दगड खास असणार असं बो चुंलोऊ यांना वाटलं. आठ वर्षाच्या एका डुक्करीणीची कत्तल केल्यानंतर त्याला हा दगड सापडला. प्राण्यांच्या पोटात हा दगड असतो. हा दगड म्हणजे डुकरांच्या अवयवाचा एक भाग असतो. तसंच औषधी दगड म्हणूनही या दगडाकडे पाहिलं जातं. त्यामुळे या दगडाला बाजारात जास्त किंमत आहे. बो चुंलोऊ यांना हा दगड सापडल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी या दगडाविषयी माहिती सांगितली. त्यानुसार त्यांना या दगडाविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.
४ इंच लांब आणि २.५ इंच रुंद असलेल्या या दगडावर केसही आढळतात. या दगडाला बेझोर असं म्हणतात. जेव्हा या बेझोरची किंमत बाजारात या इसमाने विचारली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या दगडाची किंमत जवळपास ८.७ कोटी रुपये एवढी आहे असं त्याला कळलं. या दगडाला पिग ट्रेजर म्हणजेच डुक्करांचा खजिना असंही म्हणतात. हा दगड महत्त्वाचा आहे कारण यापासून अनेक औषधं तयार होतात. तुम्ही औषधी वनस्पतींविषयी ऐकलंच असेल. पण बेझोर याला औषधी दगड असं म्हणतात. १६०० च्या काळात इंग्लडमध्ये सर्वप्रथम या दगडाची माहिती झाली होती. त्यानंतर चीनमध्ये अनेक वैद्यांनी या दगडाचा वापर औषधांसाठी करायला सुरुववात केली. विषबाधेपासून वाचण्याकरता या बेझोरपासून इंजेक्शन बनवलं जातं, सगळ्या विषबाधेवर हे एक उत्कृष्ट औषध आहे असं म्हटलं जातं.