पश्चिम महाराष्ट्रातील १0 जागांसह राज्यात ४५ जागा : चंद्रकांत पाटील यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:44 PM2019-04-23T12:44:12+5:302019-04-23T13:09:43+5:30
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या भाजप शिवसेना युतीच्या ४५ जागा निवडून येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा आम्ही जिंकणार आहोत असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या भाजप शिवसेना युतीच्या ४५ जागा निवडून येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा आम्ही जिंकणार आहोत असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता तपोवनवरील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. कोल्हापुरात भाजप शिवसेनेची मुळची ताकद आहे. त्याला सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ने बळ मिळालं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये तर काहीच अडचण नाही.
हातकणंगले मतदारसंघामध्ये विनय कोरे यांनी जाहीर घोषणा केली नसली तरी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची २ लाख मते धैर्यशील माने यांच्या कोट्यामध्ये वाढली असल्याचा दावाही पाटील यांनी केला. पवार परिवारातील कुणीही यंदा संसदेत जाणार नाही असे सांगतानाच राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.
पत्नी अंजली, आई सरस्वती पाटील, सासू शुभदा खरे यांच्यासह सकाळी साडे दहाच्या दरम्यान मतदान केले.
यांनी केले मतदान
सकाळी साडे नऊच्या सुमारास माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे यांनी मतदान केले तर याच ठिकाणी म्हणजे महापालिका न्यू पॅलेस शाळा क्र. १५ मध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि याज्ञसेनीराजे यांनी मतदान केले.
सकाळी १0 च्या दरम्यान आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील, पुतण्या ॠतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
सकाळी ११ च्या सुमारास राजू शेटटी यांनी शिरोळमध्ये मतदान केले.