प्रशासन, कन्सल्टंटचे संगनमत
By admin | Published: April 27, 2017 06:34 PM2017-04-27T18:34:55+5:302017-04-27T18:34:55+5:30
कॉँग्रेस नगरसेवकांचा आरोप : बिले देणाऱ्यांची चौकशी करावी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ :काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील काही कामांच्या खर्चाची अंदाजपत्रके चुकीची झाली असून, त्याची ‘युनिटी कन्सल्टंट’कडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी आम्ही २९ मार्च रोजी केली होती. तरीही कन्सल्टंटच्या सांगण्यावरून ठेकेदाराची बिले भागविली गेली. यामध्ये प्रशासन आणि कन्सल्टंट यांचे संगनमत आहे, असा आरोप गुरुवारी कॉँग्रेस पदाधिकारी व नगरसेवकांनी केला.
योजनेच्या कामात घोटाळा झालेला आहे; परंतु याला अधिकारी जबाबदार असून कॉँग्रेस नेत्यांचा अथवा नगरसेवकांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासाही यावेळी करण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेत घोटाळा झाला असून अधिकारी, कन्सल्टंट यांनी संगनमताने जनतेच्या पैशावर दरोडा घातल्याचा आरोप बुधवारी भाजप व ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करताच महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली. त्यातच गुरुवारी दुपारी कॉँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार खरा असला तरी तो आम्ही २९ मार्च रोजी प्रशासनाच्या नजरेस आणला होता. त्याची प्रशासनानेच गांभीर्याने दखल घेतलेली नाही, असा आक्षेप नोंदविला. तसेच २९ मार्च रोजी जल अभियंता यांच्याशी केलेला पत्रव्यवहार व त्याद्वारे केलेली चौकशीची मागणी आणि जलअभियंता यांनी दि. २९ मार्च रोजी युनिटी कन्सल्टंटला काढलेली नोटीस यांची कागदोपत्री माहिती दिली.
उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, आदींनी थेट पाईपलाईन योजनेबाबत कॉँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ठिकपुर्लीनजीक जलवाहिनीसाठी कालव्यावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाची किंमत २५ लाखांपेक्षा अधिक नाही; तरीही अंदाजपत्रकात त्याची किंमत २ कोटी ४८ लाख रुपये दाखविली आहे, ही वस्तुस्थितीच आहे. आमच्या लक्षात येताच आम्ही तत्काळ प्रशासनास त्याची माहिती दिली; पण या कामाचे साठ टक्के बिल अधिकाऱ्यांनी ठेकेदारास चुकते केले. बिल कोणाच्या शिफारशीने व कोणत्या आधारावर काढले, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. या प्रकरणात आता संशय अधिक बळावला असल्याने त्यांची संपूर्ण चौकशी करावी, अशीही मागणी देशमुख यांनी केली.
शंकास्पद मिलीभगत
थेट पाईपलाईनच्या कामावर कोणाचे लक्ष नसणे, क न्सल्टंट सांगतो तशी ठेकेदाराची बिले दिली जातात, लेखापरीक्षक कोणताही आक्षेप घेत नाही, हे सगळे शंकास्पद असून, प्रशासन आणि कन्सल्टंट यांची मिलीभगत असल्याचा आरोप शारंगधर देशमुख यांनी केला. या प्रकरणात नगरसेवक, पदाधिकारी आणि आमचे नेते यांचा कसलाही संबंध नसताना कोणी बदनामी करीत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दादा वेळ देतात कुठे?
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राज्य मंत्रिमंडळात मोठे स्थान आहे. त्याचा काही तरी फायदा कोल्हापूर शहराला व्हावा, अशी आमची भूमिका आहे. शहराला मोठा निधी मिळावा, त्यातून काही चांगली कामे व्हावीत म्हणून आम्ही नगरसेवक, महापौर, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी शहरातील विकासकामांसाठी बैठक बोलवा, अशी वारंवार दादांना विनंती केली; परंतु त्यांनी अद्यापही वेळ दिलेली नाही, अशी तक्रार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
शहरासाठी काय केलं?
राज्यात, देशात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने अमृत योजना (७२ कोटी) वगळता कोल्हापूर शहरासाठी किती निधी आणला, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आव्हान देशमुख यांनी दिले. आधी शहरासाठी काहीतरी करा आणि मग कॉँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करा, असा टोमणाही त्यांनी हाणला. सत्ता असूनही थेट पाईपलाईनसाठी लागणारी परवानगी अद्याप घेता आली नाही. पाटबंधारे विभागाची कागदोपत्री पूर्तता करता आलेली नाही. उलट ही योजना व्यवस्थित होऊ नये असेच प्रयत्न सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
लेखापरीक्षक चोर
महापालिकेचे लेखापरीक्षक चोर असल्याचा आरोप शारंगधर देशमुख यांनी केला. थेट पाईपलाईनच्या कामांपैकी १७० कोटी रुपयांची बिले ठेकेदारास दिली आहेत. काम मुदतीत झालेले नाही. झालेली कामे शंकास्पद रीतीने झाली आहेत. चुकीची अंदाजपत्रके झाली असताना एकही आक्षेप घेतला जात नाही, हे विशेष आहे. ठेकेदाराची बिले अदा करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्या-त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.