सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:22 PM2017-12-13T16:22:04+5:302017-12-13T16:34:50+5:30
गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.
कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत होता. याच संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीपासून ही सेवा सुरु होण्यासाठी मुंबई, दिल्ली येथे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता.
गेल्या आठवड्यात त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली होती. दि. २५ व २६ आॅक्टोबर रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालयाच्या संयुक्त पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल सादर झाल्यानंतर डीजीसीएने कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना दिला आहे.
दि. २४ डिसेंबरपासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. यानुसार एअर डेक्कनची ही विमानसेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असणार आहे.
मुंबईवरून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापूरसाठी विमान उडान भरेल. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी ते कोल्हापूरला पोहोचेल. याच दिवशी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर वरून हे विमान मुंबईसाठी उडान भरेल आणि दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी मुंबईला पोहोचेल अशी माहिती एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
कोल्हापूरला मोठा फायदा
विमानसेवा सुरू होण्याबाबत केंद्रीयमंत्री अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण कोल्हापूर वासियांतर्फे आभार व्यक्त करतो, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, उडाण योजनेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून निश्चितपणे गुंतवणूक वाढेल. संपूर्ण महाराष्ट्राच्यादृष्टीने कोल्हापूर हे महत्वपूर्ण शहर असून विमानसेवेच्या प्रारंभामुळे कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फायदा होईल.
तिकीटाची नोंदणी गुरुवारपासून
एअर डेक्कनचे विमान हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. मुंबई-कोल्हापूर या विमानसेवेच्या तिकीटाची नोंदणी प्रवासी हे गुरुवारपासून करु शकतात, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.