आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:46 AM2017-11-20T00:46:08+5:302017-11-20T00:46:41+5:30
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.
विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्ता वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, क्षणिक वादातून सुरू असलेल्या खूनसत्राने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेनंतर कधी कोणाचा, कशासाठी खून होईल याची शाश्वती आता राहिलेली नाही. आंबोली घाटात एक नव्हे तब्बल चार मृतदेह पाठोपाठ आढळून आले. वर्षापूर्वी स्वप्निल राजन पोवार (रा. जुना बुधवार पेठ) या चांदी व्यावसायिकाचा खून करून मृतदेह आंबा घाटातील विसावा पॉर्इंट येथील पाचशे फूट दरीत टाकला होता. या मृतदेहाचे काही अवयवच पोलिसांच्या हाती लागले. एकामोगाग एक हत्या, आत्महत्या आणि अपघाताच्या घटनांनी आंबोली, आंबा घाट नाहक बदनाम होत आहेत.
हत्येचा सुगावा लागू नये
यासाठी घाटांची निवड
राजर्षी शाहूंचे पुरोगामी विचार जोपासणाºया जिल्ह्यांत खुनासारखा वाढत्या घटना सुन्न करणाºया आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणतेच पाऊल उचलत नाही. गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी आंबोली-आंबा घाटात मृतदेहाची नियोजनबद्धरित्या विल्हेवाट लावत आहेत. याठिकाणी कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे.
तिन्ही जिल्ह्यांच्या
पोलिसांची जबाबदारी
सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आंबोली घाट आहे तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबा घाट आहे. हे दोन्ही घाट असुरक्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. नागमोडी घाटरस्ते दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहेत. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना श्वास रोखावा लागतो. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. पोलीस कधी फिरकत नाहीत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस या घटनांना जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ सामूहिक बैठक घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.