कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची तारांबळ

By उद्धव गोडसे | Published: May 7, 2024 01:36 PM2024-05-07T13:36:23+5:302024-05-07T13:37:33+5:30

भुये येथे दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी

an old man died of a heart attack while standing in the polling queue In Kolhapur | कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची तारांबळ

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची तारांबळ

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले महादेव श्रीपती सुतार (वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव सुतार हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मतदानासाठी घरातून बाहेर पडले. जवळच असलेल्या रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन ते कोसळले. हा प्रकार लक्षात येताच सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

मतदान केंद्रावरील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी

भुये (ता. करवीर) येथे मतदान करून मुलाच्या दुचाकीवरून बालिंगे पाडळी (ता. करवीर) येथे परत जाताना तोल जाऊन पडल्याने वृद्धा जखमी झाली. कमल विलास पोवार (वय ६०, मूळ रा. भुये, सध्या रा. बालिंगे पाडळी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. जखमी कमल यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

Web Title: an old man died of a heart attack while standing in the polling queue In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.