गावात जन्माला आलेल्या मुलींना दिले सरपंच पदाचे मानधन, आश्विनी पाटलांचा कौतुकास्पद उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 06:30 PM2022-02-06T18:30:57+5:302022-02-06T18:33:53+5:30
सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवणार
अनिल पाटील
सरुड : आजही आपल्या वंशाला दिवाच हवा अशी मानसिकता आहे. मात्र याच मानसिकतेला फाटा देत आपल्या गावात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावच्या सरपंच आश्विनी भिमराव पाटील प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी आपल्याला मिळणारे मानधन गावात जन्माला येणाऱ्या मुलींना देण्याचा निर्णय घेतला. अन् गेल्या वर्षेभरात त्यांनी हे मानधन या मुलींना दिले देखील.
सरपंच पदाचे मिळणारे मानधन स्वःता साठी न घेता ही रक्कम गावात जन्माला येणाऱ्या मुलींना देत सरपंच आश्विनी भिमराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यानुसार त्यांनी गेल्या एक वर्षात गावात जन्माला आलेल्या १० मुलींना प्रत्येकी १५०० रु प्रमाणे आपल्या मानधनाच्या रक्कमेतून धनादेश दिले आहेत. त्या राबवत असलेल्या या उपक्रमाचे गावात स्वागत होत आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये आश्विनी पाटील यांनी सोंडोली गावच्या सरपंच पदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी त्यांचे पती व संजय गांधी निराधार योजना समितीचे शाहुवाडी तालुका अध्यक्ष भिमराव पाटील यांच्या संकल्पनेतुन सरपंच पदाचे मिळणारे मानधन गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींना देण्याची घोषणा केली होती. गेल्या एक वर्षात गावात जन्माला आलेल्या १० मुलींना प्रत्येकी १५०० रु प्रमाणे त्यांनी धनादेश स्वरुपात दिले आहेत.
ग्राम पंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात सरपंच आश्विनी पाटील यांच्या हस्ते या धनादेशाचे संबधीत मुलींच्या पालकांना वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच स्वाती पाटील, ग्रा. प. सदस्य शिवाजी सांवत, कमलेश पाटील, आनंदी म्होळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिमराव रामचंद्र पाटील, संपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत उपक्रम सुरु ठेवणार
समाजात मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव होऊ नये व मुलींच्या जन्माचे गावात स्वागत व्हावे या उद्देशाने आपण एक महिला सरपंच या नात्याने हा सामाजिक उपक्रम राबविला आहे . यापुढील काळातही आपल्या सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत आपण हा उपक्रम सुरुच ठेवणार आहे. - आश्विनी पाटील, सरपंच