सीपीआरला हवाय ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:13 AM2018-01-08T00:13:10+5:302018-01-08T00:18:12+5:30
गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मात्र रुग्णांचे नातेवाईक आधार नंबर देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यामुळेच महापालिकेकडे सीपीआरमधील जन्म-मृत्यूच्या नोंदी होण्यास अडथळा येत आहे. यासाठी महापालिकेने आता २१ दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी आधार क्रमांक न दिल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंत तसेच बॅँकांपासून मोबाईलपर्यंत आज आधार कार्ड सक्तीचे आहे. मात्र, याबाबत अनेकांना गांभीर्य नसल्याने सीपीआर कर्मचाºयांना मृत्यूच्या नोंदी करण्यासाठी आधार कार्डसाठी अनेकदा मृतांच्या नातेवाइकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. १७ नोव्हेंबर २०१७ पासून ते ६ जानेवारी २०१८ अखेर सीपीआरमध्ये ३८ मृत्यू झाले आहेत; पण त्यांचा आधार क्रमांक नसल्याने या मृत्यूच्या नोंदी महापालिकेकडे प्रलंबित आहेत. त्या नोंदी दप्तरी व्हाव्यात, यासाठी महापालिकेने सीपीआरकडे आधार क्रमांकासाठी तगादा लावला आहे.
सीपीआरमध्ये मृत व्यक्तीचा आधार क्रमांक मिळत नसल्याने त्याच्या नोंदी करून घ्याव्यात, असे पत्र सीपीआरने महापालिकेला दिले आहे. कारण सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांकडे आधार कार्ड उपलब्ध नसते तसेच अनेक बेवारस व बेघर रुग्णही उपचारासाठी येतात. त्यांच्या मृत्यूनंतर आधारची सक्ती कोणाकडे करायची? असा प्रश्नही कर्मचाºयांना असतो. ‘आधार’ची सक्ती करून मृतदेह रोखून धरल्यास नातेवाइकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे ‘आधार’चा गुंता कसा सोडवायचा, असा यक्षप्रश्न सीपीआर प्रशासनासमोर आहे.
जन्माच्या नोंदीही प्रलंबित
मृत्यूची नोंद करण्यासाठी जसा आधार क्रमांक गरजेचा आहे, तसाच जन्माच्या नोंदीसाठी पालकांच्या आधाराची गरज आहे. त्यामुळेच २५ आॅक्टोबर २०१७ पासून महापालिकेच्या पातळीवर ६७ जन्मनोंदी प्रलंबित आहेत.