सीपीआरमध्ये जैव वैद्यकीय कचºयांचे ढीग दुर्गंधीने रुग्ण त्रस्त : कचरा उठाव करणाºया संस्थेचे बिल गेले दहा महिने थकल्याने सर्वत्र पिशव्यांच्या थप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:49 AM2018-01-18T00:49:56+5:302018-01-18T00:50:13+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर जिल्हा रुग्णालयातील कचºयाचा उठाव करणाऱ्या खासगी संस्थेचे बिल गेले दहा महिने प्रलंबित असल्याने त्या कंपनीने कचरा उठावाचे कामच गेल्या आठ दिवसांपासून बंद
कोल्हापूर : येथील सीपीआर जिल्हा रुग्णालयातील कचऱ्याचा उठाव करणाऱ्या खासगी संस्थेचे बिल गेले दहा महिने प्रलंबित असल्याने त्या कंपनीने कचरा उठावाचे कामच गेल्या आठ दिवसांपासून बंद केले आहे. परिणामी, सीपीआरच्या कोणत्याही विभागात जायचे म्हटले तर दारात कचºयाचे ढीगच तुमचे स्वागत करीत आहेत. त्याची दुर्गंधी रुग्ण व नातेवाइकांनाही असह्य करीत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. संबंधित ठेकेदार कंपनीकडून काही तरी टक्केवारी मिळावी यासाठी त्याचे बिल काढले जात नसल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू आहे.
सीपीआरमध्ये जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णही उपचारासाठी दाखल होत असतात. अलीकडे तिथे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. निधीही चांगला उपलब्ध होत आहे. त्यामुळे सोयी-सुविधा वाढू लागल्या आहेत. रुग्णांनाही त्याचा चांगला उपयोग होत आहे. एका बाजूला हे चांगले चित्र असताना काही चुकीच्या गोष्टीही घडत आहेत. त्याकडे काही सजग नागरिकांनी ‘लोकमत’चे लक्ष वेधले.
ज्या खासगी कंपनीकडे कचरा उठावाचे काम दिले आहे, ते हा कचरा उचलून त्याची झूम प्रकल्पाजवळ उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र जागेत त्याची विल्हेवाट लावतात; परंतु या कामाची त्यांची नियमित बिले काढली जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे बिल थकले की कचरा उठाव बंद अशी स्थिती आहे. मग कोणीतरी राजकीय दबाव आणून कंपनीला दटावणी केली की पुन्हा काही दिवस कचरा उठाव केला जातो, असे वास्तव आहे; परंतु आता दहा महिन्यांचे बिल थकीत असल्याचे व त्यामुळे कचरा उठाव थांबविल्याचे सांगण्यात आले.
आंधळा कारभार..
कचरा उठावाचे काम करणाºया संस्थेचे बिल दहा महिने थकीत आहे व ठेकेदार कंपनी कचरा उठावच करायला तयार नसेल तर ही बाब अभ्यागत समितीच्या निदर्शनास कशी आली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मग समिती फक्त बैठका घेऊन ‘चमकण्यासाठीच’ आहे की काय, अशीही विचारणा होऊ लागली आहे.
कुठे आहे अभ्यागत मंडळ...
सीपीआरच्या कारभारात सुधारणा म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभ्यागत मंडळ नेमले आहे. त्यांची नियमित बैठकही होते; परंतु त्यांना सीपीआरचे मूळ प्रश्न व गैरसोयी दिसत नाहीत का? अशी विचारणा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी ‘लोकमत’ने तेथे भेट दिल्यावर केली.
गलथानपणाचा कळस...!
जैव वैद्यकीय कचºयाचे ढीग रुग्णालयाच्या आवारात साचल्याने प्रशासनाने बुधवारी दुपारी काही कचरा गाद्यांवर टाकून चक्क पेटवूनच दिला. म्हणजे अगोदरच दुर्गंधी पसरली होती, त्यानंतर धुराने परिसर काळवंडून गेला. त्यातून जास्तच प्रदूषण झाले. हा सगळा कचरा ओला असतो. त्यामुळे पेटवून त्याची विल्हेवाट लागत नाही; परंतु तेवढेही भान प्रशासनाने बाळगले नाही.
कचरा उठावाचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या खासगी कंपनीकडे आहे. त्यांचे दरमहा सरासरी एक लाख रुपये बिल होते; परंतु गेल्या दहा महिन्यांपासून हे बिल थकीत आहे. त्यामुळे त्यांनी कचरा उठावाचे काम गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहे; परंतु सीपीआर प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बुधवारी ही रक्कम कंपनीला अदा केली आहे. त्यामुळे आज, गुरुवारपासून कचरा उठाव पूर्ववत होईल.
- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर