कोल्हापूर : रक्तदात्यांना ‘हेल्मेट’, ‘बूट’चे प्रलोभन, ब्लड बँकांचा राजरोस उद्योग : अन्न-औषध प्रशासन विभागाचा मात्र डोळेझाकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:19 PM2017-12-20T18:19:15+5:302017-12-20T18:23:44+5:30
रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असताना संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असताना संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
रक्त हे अमूल्य आहेच पण सध्याचे धकाधकीचे व असुरक्षित जीवनात रक्ताची गरज मोठी आहे. रक्तदान ही सामाजिक बांधीलकी समजून लोक त्यासाठी पुढे येतात. अजूनही रक्तदानाबाबत समाजामध्ये चांगली भावना आहे. कोणतेही प्रलोभने न दाखवता रक्तदात्याच्या इच्छेने रक्तदान शिबिर आयोजित करावीत व रक्तदात्यांना फळे, बिस्किटे, चहा-कॉफी द्यावी. हा रक्त संक्रमण परिषद व अन्न-औषध प्रशासनाचा नियम आहे.
पण अलीकडे यामध्ये व्यावसायिकपणा घुसल्याने विदारक चित्र समोर येत आहे. रक्तदात्यांना आकर्षित करण्यासाठी आयोजक व ब्लड बँका विविध प्रकारची प्रलोभने दाखवितात. ‘हेल्मेट’, ‘बूट’, ‘जेवणाचा डबा’, ‘टी शर्ट’ आदी वस्तू रक्तदात्यांना देऊन आकर्षित केले जात आहे. या प्रलोभनापोटी वर्षातून पाच-सहावेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
वास्तविक एकदा रक्त दिल्यानंतर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते, पण प्रलोभनापोटी दीड-दोन महिन्यालाही रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. परिणामी दूषित रक्ताचे संकलन होऊ न गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दूषित रक्तामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित विभाग काहीच करत नाही.
प्रामाणिक ब्लड बँका घाईला!
सर्वच ब्लड बँका असे उद्योग करत नाहीत, ज्या करतात त्याचे चालक चांगलेच मालामाल झाले आहेत; तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बँका घाईला आलेल्या आहेत.
मग गिफ्ट द्यायला परवडते कसे?
- रक्त संकलन करणारी बॅगची किंमत - २७० रुपये
- रक्तदात्यासह संकलित रक्ताच्या तपासणी खर्च - ३०० रुपये
- संकलित रक्तावरील प्रक्रिया खर्च - ४०० रुपये
- एकूण खर्च - ९७० रुपये
- प्रतिबॅग विक्री किंमत - १२५० रुपये
गिफ्ट दिल्याने गुणवत्तेत तडजोड
रक्तदात्यांना गिफ्ट दिल्याने ब्लड बॅँका चालविणे अवघड झाल्या आहेत. त्यामुळे कमी पगाराचा अप्रशिक्षित स्टाफ, रक्त संकलन बॅग्ज, तपासणी कीट दुय्यम प्रतीचे वापरले जाते. त्याच्या साऱ्या झळा रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.
रक्ताची कृत्रिम टंचाई
कोल्हापूर जिल्ह्यात विविध साथींच्या आजाराने रक्ताची मागणी वाढली आहे. रक्तदान शिबिरही सुरू असताना रक्ताचा तुटवडा कसा? ‘ब्लड बँक टू ब्लड बँक’ रक्ताचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याने कृत्रिम टंचाई जाणवत आहे.