शाळकरी मुलाचा अपहरण करून खून, रंकाळा पतौडी खणीत सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:24 PM2017-11-07T17:24:01+5:302017-11-07T17:35:46+5:30
मरळी (ता. पन्हाळा) येथून रविवारी दुपारी शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला रंकाळा पतौडी खणीत फेकून खून केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या मुलाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला. प्रदीप सरदार सुतार (वय ९) असे या दुर्देवी मुलाचे नाव आहे.
कोल्हापूर ,दि. ०७ : मरळी (ता. पन्हाळा) येथून रविवारी दुपारी शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला रंकाळा पतौडी खणीत फेकून खून केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या मुलाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला. प्रदीप सरदार सुतार (वय ९) असे या दुर्देवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कळे पोलिसांनी संशयित नातेवाईक पप्पू ऊर्फ विश्वास बंडू लोहार (२३, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) याच्यासह टिंबर मार्केट येथील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा खून कशासाठी केला याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
संशयित विश्वास लोहार हा प्रदीपच्या वडिलांचा मावसभाऊ आहे. त्याने प्रदीपला रंकाळा खणीत ढकलल्याची माहिती पोलिसांना दिल्याने सोमवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान शोध घेत होते. रंकाळा स्टँड ते इराणी खण या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत तीन विशेष पथके शोध घेत होती.
संशयित विश्वास लोहार हा रविवारी सकाळी म्हासुर्लीच्या बाजारामध्ये खुरपी विक्रीसाठी गेला तेथून तो दुपारी मरळी येथे मावशीच्या घरी आला. येथून तो मावस भावाचा मुलगा प्रदीपला सोबत घेऊन कोल्हापूरला आला. दोघेही रात्री नऊ वाजेपर्यंत घरी न परतल्याने सुतार कुटुंबीयांनी लोहारला फोन करून चौकशी केली असता त्याने आपण रंकाळा स्टँडवर असल्याचे सांगितले.
सरदार सुतार व अन्य नातेवाईक तत्काळ कोल्हापूरला आले. रंकाळा बसस्थानकावर लोहार एकटाच मिळाला. त्याच्याकडे प्रदीपची चौकशी केली असता त्याने मी बसस्थानकामध्ये लघुशंकेसाठी गेलो असता तो गायब झाल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी त्याला मारहाण करत कळे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्यामध्ये मरळी ते कोल्हापूर एस.टी. बसचे एक फूल व हाफ तिकीट मिळाले. पोलिसीखाक्या दाखविताच त्याने दिलेली माहितीमुळे पोलिसांची झोपच उडाली.
आरोपीने खणीत फेकल्याची दिली होती कबुली
पोलिसांनी त्याला रात्रभर विश्वासात घेऊन चौकशी केली. सोमवारी सकाळी त्याने आपण टिंबर मार्केट येथे गेलो होतो. तेथून दोघा नात्यातील तरुणांना सोबत घेतले. त्यांनी प्रदीपला पंचगंगा नदीवर नेले, तेथून रविवारी रात्री नऊच्या सुमारास रंकाळा तलाव येथील इराणी खणीमध्ये ढकलून दिल्याचे सांगितले. काहीवेळाने झुडपामध्ये मारून टाकल्याचे सांगितले. संशयित लोहार दिशाभूल करत असल्याने त्याला कळे पोलीस कोल्हापूरला घेऊन आले. त्याने इराणी खणीमध्ये प्रदीपला पाण्यात ढकलल्याची जागा दाखविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ जिल्हा आपत्ती विभाग, अग्निशामक दलास बोलावून घेतले.
ही खण दोनशे फूट खोल आहे. त्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याने पाणी रसायनमिश्रीत झाले आहे. आतमध्ये लोखंडी गज, तारा असल्याने त्यामध्ये शोध घेणे म्हणजे जिवाशी खेळल्यासारखे आहे. त्यामुळे पाणबुड्यांनी आतमध्ये उतरण्याचे धाडस केले नाही. अखेर महापालिका अग्निशामक जवानांनी पाण्यात बोट उतरवून आकड्याच्या सहाय्याने शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत मिळून आला नाही.
मंगळवारी सकाळी दिवसभर पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरु केले. अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रदीपचा मृतदेह रंकाळा पतौडी खणीत आढळला. याठिकाणी मरळी, तिसंगी, पुशिरे व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आजही मोठी गर्दी केली होती. शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ, शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे, कळेचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्यासह पोलीस कर्मचारी या परिसरात थांबून होते.
सुतार कुटुंबीयांचा आक्रोश
प्रदीप तिसरीत शिकतो. त्याच्या वडिलांचा मरळी फाटा येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. वर्षापूर्वी सरदार सुतार यांचा भाऊ बाबूराव सुतार यांचा अपघात झाला होता. त्या अपघातातून ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह साडपल्याने सुतार कुटुंबीयांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. मावसभावानेच घात केल्याचा धक्का त्यांना सहन झालेला नाही.
संशयिताकडून दिशाभूल
संशयित विश्वास लोहार हा दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने पोलीस संभ्रमावस्थेत आहेत. मुलगा सुखरूप असेल या आशेने त्याचा शहरात शोध सुरू ठेवला आहे. सोशल मीडियावरून मुलाचे छायाचित्र पाठवून तो दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रात्री उशिरापर्यंत डॉ. अमृतकर संशयियांताकडे चौकशी करत होते; परंतु शेवटपर्यंत त्याने दिशाभूल करणारी माहिती दिली.
कारण अस्पष्ट
सरदार सुतार व संशयित आरोपी विश्वास लोहार हे सख्खे मावसभाऊ आहेत. त्यांच्यात आतापर्यंत कसलाही कौटुंबीक वाद नाही. यापूर्वी अनेकवेळा विश्वासने प्रदीपला आपल्यासोबत तिसंगीला नेले होते. तो असे काही विचित्र करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. प्रदीपला गायब करण्यामागे त्याचा काय हेतू होता, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तो वेडसर असल्यासारखे बोलतो. त्यातूनच त्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.