दोन्ही काँग्रेस - शिवसेनेमध्ये अंतर्गत समझोता

By admin | Published: February 4, 2017 12:57 AM2017-02-04T00:57:07+5:302017-02-04T00:57:35+5:30

जिल्हा परिषदेचे रणांगण : भुदरगड, पन्हाळा, करवीर, दक्षिणमध्ये घडामोडींना वेग

Both the Congress - internal settlement in the Shiv Sena | दोन्ही काँग्रेस - शिवसेनेमध्ये अंतर्गत समझोता

दोन्ही काँग्रेस - शिवसेनेमध्ये अंतर्गत समझोता

Next

कोल्हापूर : स्वबळाची भाषा सर्वच राजकीय पक्षांनी केली असली तरी अनेक मतदारसंघात स्वत:च्या ‘बळा’वर उमेदवार विजयी करणे त्यांना मुश्कील आहे. त्यामुळेच नेत्यांनी अंतर्गत तडजोडीस सुरुवात केली असून भुदरगड, पन्हाळा, करवीर, दक्षिण मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समझोता झाल्याचे स्पष्ट होते.
भाजपने सत्तेच्या बळावर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून अनेक मतदारसंघांत तसे आव्हान तयार केले आहे. पक्षाचा झेंडा वेगळा असला तरी एकमेकांना राजकारणात सहकार्य करणाऱ्या नेत्यांनी अंतर्गत समझोता केला आहे. भुदगडमध्ये आमदार प्रकाश आबीटकर हे जरी शिवसेनेचे असले तरी ते आमदार सतेज पाटील यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे आमदार पाटील, आबीटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव या तिघांची येथे आघाडी पूर्ण झाली आहे. चार जिल्हा परिषदांपैकी गारगोटी व पिंपळगाव या दोन जागा आमदार आबीटकर गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पिंपळगावमधून आमदार आबीटकर यांच्या भावजय व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबीटकर यांच्या पत्नी रिंगणात उतरणार आहेत. करवीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व शिवसेना यांची छुपी युती आहे. विधानसभेसह ‘भोगावती’च्या निवडणुकीत तिघे एकमेकांना मदत करतात. आता ‘परिते’ राष्ट्रवादीला, सडोली खालसा ‘शेकाप’ तर सांगरूळ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. पन्हाळ्यात तर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांनी उघड युती केली आहे. कळे, कोतोली शिवसेनेला, पोर्ले तर्फ ठाणे राष्ट्रवादीला, सातवे काँग्रेसला (अमर पाटील) तर कोडोली अमर पाटील व भारत पाटील यांना सोडण्यात आला आहे. ‘दक्षिण’मध्ये दोन्ही कॉँग्रेसमध्ये काही ठिकाणी ‘नुरा कुस्ती’ होण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी म्हणजे महाडिक गट असेच समीकरण आहे. उर्वरित राष्ट्रवादीची ताकद फारच कमी आहे. त्यामुळे येथे आमदार सतेज पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंचायत समितीच्या दोन-तीन जागांवर येथे तडजोड होऊ शकते.

भुदरगडमध्ये ‘के. पी.- बजरंगअण्णा’ एकत्र?
भुदरगडमध्ये दिनकरराव जाधव व प्रकाश आबीटकर हे एकत्र आहेत, त्यांना सतेज पाटील यांचे पाठबळ आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांनी के. पी. पाटील यांच्याशी समझोता करण्यास सुरुवात केली आहे; पण चर्चेचे घोडे ‘आकुर्डे’ मतदारसंघावर आडून बसले आहे. पाटील यांनी येथून जीवन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर देसाई यांना येथून प्रदीप पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही माजी आमदारांचा कस लागला आहे.

Web Title: Both the Congress - internal settlement in the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.