गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार
By admin | Published: May 13, 2017 12:53 AM2017-05-13T00:53:58+5:302017-05-13T00:53:58+5:30
गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी (जि. कोल्हापूर) : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी सकाळी गव्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधीही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अनिल पांडुरंग पोवार (वय ४४, रा. आकुर्डे) व बी न्यूज वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी रघुनाथ महादेव शिंदे (५२, रा. गारगोटी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बिथरलेल्या गव्याच्या थैमानामुळे गारगोटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शुक्रवारी सकाळी आकुर्डे येथील तीन तरुण शेतकरी वैरण आणण्यासाठी ‘भैरुचा माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गेले होते. उसाचा पाला काढत असताना गव्याच्या कळपातून चुकलेल्या मोठ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये तिघांपैकी दोघे पळून गेले. तर अनिल पोवार या तरुणावर गव्याने हल्ला केला. अनिल यांच्या पोटात शिंग घुसून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य हल्ल्यातून बचावलेल्या दोघांनी ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, कोल्हापूरच्या एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे दुपारी बाराच्या दरम्यान घटनास्थळी गेले.
यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. रघुनाथ शिंदे शेताच्या बांधावर उभे राहून गव्याचे शूटिंग करत असताना गव्याने मागे फिरून त्यांना धडक दिली. या हल्ल्यात शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे यांना मोटारसायकलवरून गारगोटी येथे आणले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक करून तातडीने कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत अनिल पोवार हे आकुर्डे येथील दत्तगुरू दूध संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले आहेत. तर मृत रघुनाथ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
पाण्यासाठी गवे शिवारात घुसले
जंगलातील गवे सध्या पाण्याच्या शोधासाठी शिवारात घुसल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. शेतात, पाण्याच्या जवळ जाताना सावधानता बाळगावी. कोणत्याही परिस्थितीत त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घ्या असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी अशोक पाटील, वनक्षेत्रपाल भुदरगड यांनी केले आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून....
गव्यापासून बचावासाठी काही लोक दहा फूट उंचीच्या बांधावर उभे होते. अचानक गवा बांधावर चढल्याने तारांबळ उडाली. यावेळी गव्याने दिशा बदलली. त्यावेळी विठ्ठल कुंभार बांधावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून गवा गेला. त्याचवेळी समोर शूटिंग करत असलेल्या पत्रकार रघुनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला, पण केवळ दैव बलवत्तर म्हणून चार-पाचजणांचा जीव वाचला.
जमावाच्या गोंगाटाने गवे बिथरले
गेल्या काही दिवसांपासून गव्याचा कळप या परिसरात आहे. शुक्रवारी सकाळी अनिल पोवार यांच्या मृत्यूनंतर परिसरातील ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी जमला. गव्याच्या मागावर हा जमाव होता. जमावातील काहीजण आरडाओरड करत होते. जमावाच्या गोंगाटामुळेच गवे बिथरले असण्याची शक्यता आहे.
मोबाईलवरुन शूटिंगचा असुरी आनंद
घटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. झाडावर बसून काही तरुण या गव्यांची टेहळणी करत होते. गवा हल्ला करीत असताना काही उत्साही तरुण मोबाईलवर हल्ल्याचे शूटिंग करीत होते, तर काहीजण आरडाओरड करत होते.
यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. त्यातच पत्रकाराचा मृत्यू झाला.