कोल्हापुरात गुंडगिरी फोफावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:08 AM2018-05-07T01:08:50+5:302018-05-07T01:08:50+5:30
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सेंट्रिंग, मजुरीची कामे करीत असले तरी ते गल्लीत ‘दादा’-‘भाई’ म्हणूनच मिरवतात. दिवस-रात्र मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून कोणी पण उठतो तो थेट भोसकतो. राजारामपुरी मातंग वसाहतीसह शहरातील १७ झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न अशा घटनांनी या झोपडपट्ट्या हादरून गेल्या आहेत.
दहा दिवसांपूर्वी राजारामपुरी मातंग वसाहत येथील पेंटर संदीप सखाराम बेरड (वय ३५, रा. राजारामपुरी, मातंग वसाहत) याचा खून वहिनीला का शिव्या देतोस, अशी विचारणा केल्याच्या रागातून झाला. तर पाणी अंगावर मारू नकोस अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून मलिक प्रभाकर भोसले (४२) याच्यावर खुनी हल्ला केला. या दोन्ही घटना पोलिसांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.
‘भाईगिरी’च्या जोरावर दमदाटी करून पैसे उकळणे, चोºया, घरफोडी करण्यामध्ये येथील तरुण आघाडीवर आहेत. पैशांसाठी वाट्टेल ते करणारे येथील ‘दादा’-‘भाई’ राजकीय नेते व सावकारांच्या दावणीला बांधले आहेत. निवडणूक असो किंवा व्यवसायातील वसुली, त्यासाठी या गुन्हेगारांचा वापर केला जातो. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोºया, हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारांचे वास्तव्य या झोपडपट्ट्यांमधूनच आहे.
राजारामपुरी मातंग वसाहत, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शाहूनगर, दौलतनगर, यादवनगर, कनाननगर, सदर बाजार, शिवाजी पार्क, सुधाकर जोशी नगर, गंजीमाळ, बिडी कामगार चाळ, वारे वसाहत, आदी झोपडपट्ट्या पोलीस रेकॉर्डवर आहेत. येथील नवीन गुन्हेगार पुढे येऊ लागले आहेत. गल्लीतून जाताना एकमेकांकडे पाहणे देखील जिवावर बेतले जात आहे. कोणाला भांडू नको, असा सल्ला देणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखी भयावह परिस्थिती या झोपडपट्ट्यांमध्ये दिसते. कोणीही उठतो तो थेट तलवार, चाकू, सत्तूर बाहेर काढतो. त्यांना रोखण्याचे धाडस कोणीच करू शकत नाही. झोपडपट्ट्यांतील मजूर लोक सेंट्रिंग, मोलमजुरी, भंगार गोळा करण्याचे काम करतात. घरातून संस्कार न मिळाल्याने बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गल्ली-बोळात चेष्टा-मस्करी करताना त्यातून होणारी हाणामारी, त्यातून सुडाची भावना या संघर्षातून कोणाचातरी बळी जातो. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होते. तीन महिन्यांनी हेच आरोपी पुन्हा झोपडपट्टीमध्ये बिनधास्त वावरतात. वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत पोलिसांनी येथील लोकांचे प्रबोधन करणे अपेक्षित आहे.
गुन्हेगारच खबरे
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार पोलिसांचे खबरे आहेत. बहुतांशी झोपडपट्टीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार खबरे आहेत. पोलिसांच्या समोर ऊठबस असल्याने त्यांची दादागिरी वाढत आहे. पोलीसही त्यांनी केलेल्या गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.