कै. विजय पोवार आणि सागर चौगुले यांना वीर शिवा काशिद अभिनय पुरस्कार जाहीर

By Admin | Published: April 2, 2017 03:28 PM2017-04-02T15:28:50+5:302017-04-02T15:28:50+5:30

वारणेत दि. ५ व ६ रोजी तिसरा प्रज्ञान कला महोत्सव

Cai Veer Shiva Kashyad Award for Vijay Pandar and Sagar Chougule | कै. विजय पोवार आणि सागर चौगुले यांना वीर शिवा काशिद अभिनय पुरस्कार जाहीर

कै. विजय पोवार आणि सागर चौगुले यांना वीर शिवा काशिद अभिनय पुरस्कार जाहीर

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीतर्फे यंदा तिसरा प्रज्ञान कला महोत्सव दि. ५ व ६ एप्रिल रोजी रोज सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शास्त्री भवन वारणानगर येथे होणार असून अकादमीतर्फे देण्यात येणारा पहिला वीर शिवा काशिद अभिनय पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी कै. विजय शंकर पोवार आणि कै. सागर चौगुले यांना ५ एप्रिल रोजी विनय कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात गायन वादन आणि लघुपट संवादाची मेजवानीही असणार आहे, अशी माहिती प्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष रमेश हराळे आणि सचिव निलेश आवटी यांनी दिली.

दिवंगत विजय पोवार हे कवी, प्रयोगशील रंगकर्मी, नाट्यशिक्षक. त्यांनी अभिनयातून अलीकडे सर्वत्र चर्चेत असलेल्या "चौकट" या लघुपटाच्या मानवीय आशयाला एक व्यापक परिमाण दिले. खजिन्याची विहीर, घोटभर पाणी, कोंडुरा, आला रे राजा अशा प्रायोगिक नाटकांबरोबरच विद्रोही आशयाचे "सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम" या रिंगण नाटकाचे त्यांनी केलेले दिग्दर्शनही उल्लेखनीय ठरले.

"अग्निदिव्य" नाटकात शाहू राजांची भूमिका साकारतानाच रंगमंचावरुनच एक्झिट घेतलेल्या सागर चौगुले यालाही अकादमीतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट निर्मात्याच्या घरात जन्मलेला, चित्रपटातून नायक साकारत असतानाच नाटकातूनही विविधरंगी भूमिका स्वीकारुन स्वत:च्या अभिनय गुणांनाच नेहमी वाढत ठेवणारा अभिनेता सागर रंगमंचावर असताना आपले सर्वस्व ओतून, बारकावे शोधून त्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी धडपडत असे.

या पुरस्कार वितरणावेळी या कालगत अभिनेत्यांचे कुटुंबीय तसेच अग्निदिव्यचे दिग्दर्शक सुनील माने, तसेच कपिल मुळे आणि संघसेन जगतकर, शेखर गुरव हे देखील उपस्थित असतील. ५ एप्रिल रोजी नृत्य कलाकार नुपूर रावळ तोरो आणि त्यांच्या शिष्यांची कथ्थक नृत्याचे सादरीकरण तसेच स्नेहल कुलकर्णी यांचे गायन अशी मेजवानी असणार आहे. दि. ६ रोजी कोडोली येथील वसंत संगीत विद्यालयातर्फे गायनाची मैफिल होणार आहे.

विवेकी लघुपटांचे महोत्सवात प्रदर्शन

"फिल्म मेकिंग नव्हे तर विचार मेकिंग" अशा घोषवाक्यासह सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आटपाट ही संस्था आणि अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या महाराष्ट्र शाखेतर्फे "विवेक" लघुपट स्पर्धा गतवर्षी आयोजित केली होती. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील पुरस्कार विजेते तसेच काही निवडक लघुपट प्रज्ञान महोत्सवात दाखवण्यात येतील.

महोत्सवातील लघुपट

कोष (समीर वंजारी/ सर्वोत्कृष्ट लघुपट) , पावला (निलेश शेलार/ सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट), वारी (गौरव जोशी, आशिष सावंत/ सर्वोत्कृष्ट माहितीपट), श्रद्धा (अजित खैरनार/ सर्वोत्कृष्ट अँनिमेशनपट), चौकट (उमेश बगाडे), अंकुर (अक्षय देशपांडे), लिंबू मिरची (सुयोग झेंडे), लाइन आॅफ कंट्रोल (श्रीकांत वाळेकर), लाईन (हृषीकेश तुराई), लागीर (प्रतिक जाधव/ अनिस इचलकरंजी) हे लघुपट यावेळी महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत.

स्वप्निल राजशेखर, अजय कुरणे यांची उपस्थिती

याशिवाय जय मल्हार व कट्यार काळजात घुसली फेम अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी दिग्दर्शन केलेला "सावट" तर पटकथा लिहिलेला "बलुतं" (दिग्दर्शक : अजय कुरणे) या लघुपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. या सर्व लघुपटांची निवड समिक्षक व फिल्म क्युरेटर डॉ. अनमोल कोठाडिया यांनी केली आहे. ते प्रत्येक लघुपटानंतर रसिकांशी आणि उपस्थित दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्याशी संवाद साधणार आहेत. ५ एप्रिलला चौकट, सावट व बलुतं दाखविण्यात येणार असून त्या प्रसंगी स्वप्नील राजशेखर तसेच अजय कुरणे ( तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे पूर्व-दिग्दर्शक) आणि सावट, चौकट साठी सर्जनशील सिनेछायाचित्रण करणारा अभिषेक शेटे उपस्थित राहणार आहेत.

६ एप्रिल रोजी इतर विवेकी लघुपट दाखविण्यात येतील. त्यावेळी कोषचा दिग्दर्शक समीर वंजारी आणि मूळ कथा लेखिका धनश्री पाटील हेही आवर्जून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय हृषीकेश तुराई, अमरनाथ कहाडे, प्रतीक जाधव , महाराष्ट्र अनिसचे रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, संभाजी भोसले, सुनील स्वामी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

Web Title: Cai Veer Shiva Kashyad Award for Vijay Pandar and Sagar Chougule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.