सुमोंनाही कोल्हापूरच्या लाल मातीचे आकर्षण--जपानी पथकाकडून लघुपट निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:10 AM2017-09-19T01:10:32+5:302017-09-19T01:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरी लाल मातीतील कुस्तीचे अप्रूप भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही आजही आहे. जपानच्या सुमो पैलवानांनाही या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता आहे. या कुस्तीतील बारकावे त्यांना उपयोगात यावेत यासाठी गेले दोन दिवस खास कोल्हापुरी कुस्तीचा अभ्यास करणारे जपानमधील आठजण केवळ लाल मातीतील कुस्तीवर लघुपट बनवत आहेत. त्याचे चित्रीकरण कोल्हापुरातील विविध तालमींमध्ये सोमवारी झाले.
लाल मातीतील कुस्ती आखाडे दिल्लीसह कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहेत. यासह दिग्गज मल्लांची परंपरा लाभलेल्या या कोल्हापुरात लाल मातीत सराव करणारा मल्ल व त्याची दिनचर्या काय असते. त्याचा लाभ जपानमधील कुस्तिगीरांना व सुमो पैलवानांना व्हावा याकरिता आॅस्ट्रेलियन दिग्दर्शक डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली जपानमधील आठजणांनी लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून या परदेशी पाहुण्यांनी कोल्हापुरात मुक्काम ठोकला होता. त्यात रविवारी प्रथम त्यांनी महान भारत केसरी दादू चौगुले यांची मुलाखत घेतली. त्यानंतर मोतीबाग तालीम येथील मल्लांची पहाटे चार वाजल्यापासून ते अगदी ते रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या त्यांनी कॅमेºयात टिपली.
यासह सोमवारी पहाटे चार वाजता या परदेशी पाहुण्यांनी गंगावेश येथील शाहू विजयी गंगावेश तालमीमधील मल्लांचीही दिनचर्या टिपली. त्यात ते राहतात कसे, जेवतात काय, खुराक काय, मालिश करण्याची पद्धत आदींची माहिती घेत त्यांचे चित्रीकरण केले. या परदेशी पाहुण्यांची कोल्हापुरातील सर्व व्यवस्था चित्रपटनिर्मिती व्यवस्थापक मिलिंद अष्टेकर यांनी केली होती.
जपानी लोकांना भारतीय कुस्तीबद्दल उत्सुकता आहे. त्यात कोल्हापुरातील तालमींबद्दल जादा विशेष आकर्षण आहे. यातील बारकावे माहिती करण्याबाबत त्यांना आकर्षण आहे. त्यामुळे माझ्या दिग्दर्शनाखाली जपानमधील तीन कॅमेरामनसह आठजणांचे पथक दिल्ली, कोल्हापुरात चित्रीकरण केले. सुमो पैलवानांना लाल मातीतील कुस्तीतील बारकाव्यांचा निश्चितच लाभ होईल.
- डॅनियल, आॅस्ट्रेलियन दिग्दर्शक