गाण्याला साथसंगत करताना पोषक वातावरण तयार करा
By admin | Published: April 27, 2015 09:41 PM2015-04-27T21:41:24+5:302015-04-28T00:47:08+5:30
अरविंद मुळगावकर : कुडाळ येथे गप्पाटप्पा कार्यक्रम
कुडाळ : गाण्याला पोषक वादन आणि वादनातील गोडी या दोन गोष्टी ज्या तबलावादकाला साध्य झाल्या, तो खरा उस्ताद. तबलावादकाने गाण्याला साथसंगत करताना पोषक वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांनी कु डाळ येथील साहित्यिक आरती प्रभू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
कुडाळ येथील आरती प्रभू कला अकादमीच्यावतीने साहित्यिक आरती प्रभू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुडाळ हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित संगीतप्रेमींसोबत रंगलेल्या गप्पाटप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुळगावकर यांची मुलाखत इंद्रजीत सावंत यांनी घेतली. यावेळी पं. मुळगावकर म्हणाले, आपल्याला लहानपणापासूनच तबलावादनाची आवड होती. तबला वादन क्षेत्रामध्येच उल्लेखनीय कामगिरी करण्याचे माझे उद्दिष्ट होते. पुढे मुंबईत स्थायिक असलेले व सिंधुदुर्गचे सुपुत्र रामकृष्ण उर्फ दादा दाभोलकर यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यामुळेच तबला उस्ताद अलारखाँ यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या संपर्कात आलो, असे मुळगावकर यांनी सांगितले.
त्यानंतर तबला उस्ताद अमीर हुसेन खाँ यांचे तबलावादन ऐकण्याची संधी मिळाली. त्यांची तबल्यावर थिरकणारी बोटे पाहून भारावून गेलो आणि त्यांनाच गुरू मानून त्यांचे शिष्यत्त्व स्वीकारले.
भाई तळेकर यांच्या हस्ते पं. मुळगावकर यांचे स्वागत करण्यात आले. तर ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक चंदू शिरसाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद वैद्य, केदार सामंत, संस्थेचे पदाधिकारी व संगीतप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता कुडाळ येथील युवा तबलावादक सिध्देश कुंटे याच्या तबलावादनाने झाली. प्रास्ताविक आनंद वैद्य, आभार अणावकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
गंडाबंधन दोरा ठेवलाय जपून : मुळगावकर
तबला उस्ताद अमीर हुसेन खान यांनी ७७ वर्षांपूर्वी बांधलेला गंडाबंधनाचा दोरा अजूनही जशास तसा जपून ठेवल्याचे यावेळी पं. मुळगावकर यांनी सांगितले. यावेळी आयोजक आणि उपस्थित संगीतप्रेमींच्या आग्रहास्तव पं. मुळगावकर यांनी आपले तबलावादन करून तबलावादनातील विविध अंगांचे दर्शन घडविले.