विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारची बुधवारी कोल्हापूर येथे सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:49 PM2017-11-03T19:49:58+5:302017-11-03T19:54:18+5:30
कोल्हापूर : आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) व आॅल इंडिया यूथ फेडरेशनतर्फे (एआयवायएफ) सरकारच्या विरोधातील मोहिमेअंतर्गत ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ परिषदा घेण्यात येत आहेत.
कोल्हापूर : आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) व आॅल इंडिया यूथ फेडरेशनतर्फे (एआयवायएफ) सरकारच्या विरोधातील मोहिमेअंतर्गत ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ परिषदा घेण्यात येत आहेत. त्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याची सभा होणार आहे, अशी माहिती ‘एआयवायएफ’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य फोंडे म्हणाले, सरकार विरोधात एआयएसएफ आणि एआयवायएफतर्फे देशातील १६ राज्यांतून ६० दिवसांचा ‘सेव्ह इंडिया, चेंज इंडिया’ लाँगमार्च दि. १५ जुलै ते १२ सप्टेंबरदरम्यान काढण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कोल्हापुरात बुधवारी युवक-विद्यार्थी परिषद आयोजित केली आहे. त्यामध्ये विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेत समाज, राजकारण याविषयी विद्यार्थी, युवकांतर्फे विविध ठराव मांडले जाणार आहे. यासाठी कॉम्रेड उमा पानसरे, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि कोल्हापूरमधील दोन हजार युवक, विद्यार्थी उपस्थित असणार आहेत. परिषदेनंतर कन्हैयाकुमार हा डाव्या पुरोगामी विचारांचे नेते, लेखक आदी मान्यवरांशी संवाद साधणार आहे. अनिल चव्हाणलिखित कन्हैयाकुमारचे चरित्र ‘जय भीम-लाल सलाम’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, शनिवारी दुपारी चार वाजता भारतीय कम्युनिट पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. या पत्रकार परिषदेस कम्युनिट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, शहर सचिव अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, धीरज कठारे, कृष्णा पानसे, राहुल पाटील, आदी उपस्थित होते.
सभा ‘फेसबुक लाईव्ह’
कन्हैयाकुमारची कोल्हापुरातील सभा ही फेसबुक आणि यु-ट्यूबवर लाईव्ह असणार आहे, असे फोंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, एआयएसएफ, एआयवायएफ आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे परिषद आणि सभेची तयारी सुरू आहे. परिषदेच्या ठिकाणाला ‘शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. कन्हैय्याकुमारची सभा नियोजित वेळेनुसार होईल. त्यात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्याच ताकदीने उत्तर दिले जाईल. सभेच्या ठिकाणी दोनशे कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत.