अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:35 PM2018-11-16T15:35:12+5:302018-11-16T15:42:01+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहायक पोलीस निरीक्षक बिद्रे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा मित्र फळणीकर, कारचालक अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अजय कदम करीत आहेत. त्यांना सरकारी वकीलांनी माहिती देण्यासाठी बोलविले असता गुन्ह्यामध्ये मृतदेह मिळालेला नाही.
पुरावे भक्कम नाहीत, त्यामुळे तुम्ही ही केस घेवू नका. बिद्रेच्या मृत्यच्या दाखल्याचा अहवाल महानगरपालिकेकडे देण्यासाठी नकार दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मी ३०२ खूनाचा गुन्हा दाखल असलेबाबतचा स्पष्ट अहवाल देणार नाही असे सांगितले. कुरुंदकरच्या घरामध्ये व अश्विनी बिद्रे यांच्या फलॅटमध्ये मिळालेल्या वस्तु देण्याचे आदेश झाले असताना त्या पूर्णत: दिलेल्या नाहीत. कदम यांचे संशयित करुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे सर्वोच न्यायालयाकडे अभय कुरुंदकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याठिकाणीसुध्दा सरकारी वकीलांना चुकीचा माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन होवू शकतो.
बिद्रे यांच्या खूनाचा तपास तांत्रिकबाबीवर आहे. त्याचे ज्ञान कदम यांना नसल्याने ते जाहीरपणे आरोपी सुटतील अशी भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला या तपासावरुन हटवावे, अशी मागणी शासनाला आम्ही केली असल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी सांगितले.
बिद्रे हत्यांकाडाचा निकाल हा अलिबाग (रायगड) सत्र न्यायालयाने एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित सुनावणीसाठी, सरकारी वकीलांसह साक्षीदारांना माहिती करण्यासाठी या हत्येचा तपास संगिता अल्फान्सो यांचेकडे द्यावे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांचेकडेच राहावा, अशी मागणी केल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी पत्रकारांना सांगितले.
अश्विनी बिद्रे हत्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटूंबियांनी शासनाकडे केली होती. परंतू निकम हे मूळचे जळगावचे आहेत. या गुन्ह्यातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा खडसे यांचा भाचा आहे. ते जळगावचे आहेत.
निकम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजिवकुमार यांना सांगितले की, पोलीसांच्या विरोधामध्ये आजपर्यंत मी लढलो नाही. त्यामुळे हा खटला मी घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे निकम हे या खटल्याचे वकील म्हणून आम्हाला नको आहेत. दूसऱ्या वकीलांचे नाव आम्ही दिले असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले.