‘कुलगुरू हरवले’च्या पत्रकातून निषेध,‘एनएसयूआय’चे आंदोलन : देवानंद शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:34 AM2018-04-07T00:34:20+5:302018-04-07T00:34:20+5:30
कोल्हापूर : ‘कुलगुरू हरवले आहेत’, ‘मिसिंग व्ही. सी.’ अशी पत्रके लावून नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध
कोल्हापूर : ‘कुलगुरू हरवले आहेत’, ‘मिसिंग व्ही. सी.’ अशी पत्रके लावून नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध केला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या विरोधात घोषणाबाजी केली.
केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ‘एनआयआरएफ’चे मानांकन (रँकिंग) जाहीर केले आहे. यामध्ये देशातील अव्वल शंभरच्या यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. या मानांकनाच्या क्रमवारीमध्ये दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ हे २८ व्या स्थानावर होते. कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विद्यापीठाचे मानांकन खाली गेले आहे; कारण मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यापासून कुलगुरूंना शोधण्याची वेळ आली आहे. विद्यापीठातील अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न होत नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येते. डॉ. मुळे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. अनेक गैरप्रकार डोळ्यांसमोर घडूनही कारवाई होत नाही; म्हणून ‘एनएसयूआय’ने ‘विद्यापीठ परिसरात कुलगुरूंना शोधा’ अशी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत विद्यापीठ परिसरात शुक्रवारी कुलगुरूंचा निषेध करण्यात आला. त्यासह त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती ‘एनएसयूआय’चे शहराध्यक्ष पार्थ मुंडे यांनी पत्रकाद्वारे दिली. यावेळी दीपक थोरात, नीलेश यादव, किशोर आयरे, अजिंक्य पाटील, सौरभ नाईक, मकरंद कवठेकर, सुशांत चव्हाण, विनायक पाटोळे, पंकज मगर, दस्तगीर शेख, आदित्य डोंगळे, अभय शेळके, आशुतोष मगर, सौरभ घाटगे, सुरेश साबळे, हृषिकेश चव्हाण, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात शुक्रवारी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘कुलगुरू हरवले आहेत’ ची पत्रके लावून कुलगुरूंचा निषेध केला. तसेच त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.