देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस, नाना पाटेकरांकडून फडणवीसांचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:35 AM2018-01-24T11:35:49+5:302018-01-24T11:44:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं आहे.
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नाना पाटेकर सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'आपला मानूस'च्या प्रमोशनात व्यस्त आहेत. कोल्हापुरात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते आला असता पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं.
नाना पाटेकर यावेळी बोलले की, 'सध्याचा विरोधी पक्ष निवडणूक डोक्यात ठेवून काम करत असल्या कारणाने विधानसभा आणि लोकसभा चालू देत नाही. निवडणूक संपल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे'. यावेळी नाना पाटेकरांनी बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा देत बाळासाहेबांनी मला मुलासारखं वाढवलं असं सांगितलं. बाळासाहेबांमुळे राज आणि उद्धव हे दोघेही माझ्या जवळचे आहेत असंही नानांनी यावेळी म्हटलं. बरेच वर्ष रेंगाळणारा सीमाप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षाही यावेळी नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा
याआधी पुण्यात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे राज माझा कालही प्रेक्षक होता आणि यापुढेही राहील, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वादावर पडदा टाकला. राजकारणात जाणार नसलो तरी नट म्हणून सतत व्यक्त होत राहीन, असेही नाना म्हणाले होते.
पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले, त्या वेळेस मी आपलेपणाच्या भावनेतूनच बोललो होतो. थोडी कुरबूर होत असतेच. त्या वेळचा विषय तेव्हाच सोडून द्यायचा असतो. त्यामुळे ते माझा आगामी चित्रपट नक्की पाहतील. मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यातूनही समजा गेलोच तर पक्षप्रमुखालाच शिव्या घालत आठवडाभरात सर्व पक्ष फिरून घरी बसेन. आज समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. ती सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यामागे वाढती लोकसंख्या हे मूळ कारण आहे. लोकांनी माझी जात पाहून माझ्या अभिनयावर प्रेम केले नाही. प्रत्येकाच्या मनगटामध्ये जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन समाजाचा स्तर वाढविला पाहिजे.
प्रतिसेन्सॉर नको
‘पद्मावत’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना नाना म्हणाले, चित्रपटाला एकदा सेन्सॉरने मान्यता दिल्यावर त्यावर प्रतिसेन्सॉर नसावा. आपला विरोध हा आपल्यापुरता मर्यादित ठेवावा. तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्यामुळे त्यावर सेन्सॉर हवाच, असेही पाटेकर यांनी सांगितले.