कागल पालिका सभेत धुमशान : पालिका जळिताचा राजकीय भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:07 AM2017-11-15T01:07:01+5:302017-11-15T01:07:52+5:30
कसबा सांगाव : सत्ताधारी-विरोधकांत होणारी हातघाई, ढकलाढकली, सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विरोधी पक्षनेता विशाल पाटील यांचे एकमेकांच्या अंगावर धावून
कसबा सांगाव : सत्ताधारी-विरोधकांत होणारी हातघाई, ढकलाढकली, सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विरोधी पक्षनेता विशाल पाटील यांचे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे यामुळे कागल नगरपालिकेची आजची विशेष सभा वादळी ठरली. नगरपालिका इमारत जळितानंतर ही पहिलीच सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, पालिका जळिताचा राजकीय भडका या सभेत उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्याची पाळी प्रशासनावर आली. पालिका इतिहासात पहिल्यादांच पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पडली.
कागल येथील शाहूनगर वाचनालयात सभा पार पडली. पालिकेला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही सभा बोलावण्यात आली होती. विषयपत्रिकेवर नऊ विषय होते. सताधाºयांनी गोंधळातच सर्व विषय बहुमताने मंजूर केले. मात्र, या सर्वच विषयांना विरोधकांनी तीव्र विरोध केला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. मुख्याधिकारी टीना गवळी पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या.
पालिका इमारतीला लागलेल्या भीषण आगीची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, बांधकाम अभियंत्याच्या एफआयआरची कॉपी जोडूनच मुदतवाढ प्रस्ताव पाठवावा, मंजुरीनंतरच काम करण्यात यावे, इमारतीला आग लावली गेली असल्यास त्यामधील दोषीकडून व्याजासह नुकसानभरपाई वसूल करावी, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खर्चाचे अदांजपत्रक तयार करावे, नुकसानीच्या रकमेचा अजेंड्यावर उल्लेख नाही. नुकसानीच्या खर्चाची रक्कम प्रशासनाने कौन्सिलसमोर आणल्यानंतरच ती मंजूर करण्यात यावी. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवावा, अन्यथा या कामासाठी बेहिशेबी रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे. झालेल्या नुकसानीसंदर्भात चौकशी समिती नेमावी आदी मागण्यांचे निवेदन सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी भाजपा पक्षप्रतोद विशाल पाटील हे देण्यासाठी व्यासपीठासमोर गेल्यानंतर विषयांना सुरुवात होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले.
सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विशाल पाटील यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यामध्ये ओढाओढीत विशाल पाटील यांच्या शर्टाची बटणे तुटली. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता मात्र दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील माळगे हे पोलीस कर्मचाºयांना घेऊन उपस्थित झाले.
गोंधळातच सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवर या दुर्घटनेची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी, विकासकामांचा निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, नुकसानीसाठी आकस्मिक निधी मिळावा, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे व नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करावे? पुढील काळात खबरदारी घ्यावी, पालिकेचे कामकाज कन्याशाळेत स्थलांतरित करावे आदींसह नऊ विषय या विषयपत्रिकेवर होते. सत्ताधारी गटाकडून प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, गाड्डीवड्ड, विवेक लोटे, सौरभ पाटील, आदींनी विरोधकांचे आरोप फेटाळत विरोधकांच्या काही विधानांचा निषेध केला.
त्यांच्या आरोपांचे मुद्दे खोडून काढीत सर्व विषय बहुमताने मंजूर केले. विशाल पाटील यांनी पालिका पेटवल्याच्या संदर्भात केलेले गंभीर आरोप मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी प्रवीण काळबर यांनी करत पाटील यांनी माफी मागितल्याशिवाय सभा सुरू करू नये अशी मागणी लावून धरली.
यावेळी सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली. नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात प्रशासनाच्या मदतीने कामे पूर्ण करावीत, असा ठराव सत्ताधाºयांनी केला. उपनगराध्यक्ष नितीन धोंडे यांनी यावेळी सत्ताधारी नगरसेवक व पालिका कर्मचाºयांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व विरोधकांनी दिशाहीन चुकीचे आरोप करू नयेत, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले, तर नगराध्यक्षा माळी यांनी सभागृहाचे भान ठेवून थोडक्यात बोला, असे सांगत सभेचे कामकाज गतिमान केले.
आगप्रकरणी निष्पक्ष तपास करावा
सभा संपल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना निवेदन दिले. त्यामध्ये भाजपा नगरसेवकांनीच सुपारी देऊन कागल पालिका जळीत कृत्य घडवून आणले आहे, अशी आमची खात्री आहे. तपासात राजकारण न आणता निष्पक्षपाती तपास करावा व आरोपींना कठोर शासन करावे. भाजपा नगरसेवक आरोपी शोधण्यासाठी मदत करण्यापेक्षा राजकारण करीत राष्ट्रवादी नगरसेवकांवर चुकीचे व बेताल आरोप करीत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.