विविध तरी आंतरभारती

By admin | Published: December 25, 2015 11:33 PM2015-12-25T23:33:02+5:302015-12-26T00:07:45+5:30

किफनामा डॉ. अनमोल कोठाडिया

Different types of interstitials | विविध तरी आंतरभारती

विविध तरी आंतरभारती

Next

जेथे रजतपटावरचा चित्रपट ऋकठ (अनेक युरोपियन चित्रपटांमध्ये ‘समाप्त’ऐवजी येणारा शब्द) पावतो, तेथून पुढेही तो प्रेक्षकमनात सुरूच राहतो. या अर्थाने चांगला चित्रपट / महोत्सव कधीही संपत नसतो. तो केवळ विराम घेत असतो. पुढच्या महोत्सवाच्या ओढीने....चेकॉव्हच्या कथेवर आधारित नीरज नारकर फटाक्यांच्या कारखान्यातील एका बालश्रमिकाची वेदना मांडतो. ‘नाना परीट, पांगरी’ हे शीर्षक म्हणजे त्या मुलाने आपल्या आजोबांना लिहिलेल्या पत्रावरचा अपुरा पत्ता आहे; पण हे पत्र नानांना मिळेल? माझ्या मते येथे नाना म्हणजे केवळ त्याचे आजोबा नसून समाजातील जबाबदार, कृतीशील संवेदनशीलता होय. प्रेक्षक या पातळीवर पोहोचावा म्हणून तर पत्राच्या निवेदनातून हा लघुपट प्रचारकी न होता उलगडतो. हे पत्र मर्मस्थळी पोहोचले, तर बालमजुरी थांबेलही ! सोपान भगवान जवने या सौजन्यशील कार्यपद्धती असणाऱ्या एस. टी. कंडक्टरचे प्रेरणादायी जगणे ‘एकला चलो रे’ या माहितीपटातून स्वप्निल राजशेखर यांनी प्रस्तुत केले आहे. सर्वसामान्यांतील अशा असामान्य नायकांना एकट्यानेच का चालावे लागते, हा मात्र प्रश्नच! पर्यावरणपूरक पारंपरिक ‘खोपा’ निर्मितीचे केवळ डॉक्युमेंटेशन करू पाहणारा मिलिंद रणदिवे दिग्दर्शित माहितीपटही महत्त्वाचा ठरतो.गोल्डन सिक्स्टीज, काही प्रश्न.भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत असे, असा भाबडा समज काहीजण बाळगतात. असाच काही चित्रपटविषयक लेखन करणाऱ्यांचा ६०च्या दशकाबद्दल ‘सुवर्णदशक’ असल्याचा समज. अशी एखादी संज्ञा रूढ झाली की जडत्वाच्या नियमाने उतारावरून घरंगळत राहतेच. प्रत्येक दशकातच काही अव्वल तर बहुसंख्य सुमार चित्रपटांची निर्मिती झाली आहे. वस्तुनिष्ठतेने पाहिले तर हे कळेल. त्यातही पुन्हा ‘पाथेर पांचाली’ हा वादातीतपणे एक महत्त्वाचा जागतिक स्तरावरचा चित्रपट आहे; पण ‘देवदास’, ‘श्री ४२०’, ‘मि. अ‍ॅँड मिसेस ५५’, ‘सीमा’, ‘झनक झनक पायल बाजे’ हे व्यावसायिक चौकटीतील अत्यंत महत्त्वाचे चित्रपट असले तरी दरवर्षीच असे काही चित्रपट सांगता येणार नाहीत का...? चित्रपट माध्यम प्रवाही आहे. दरवर्षी काही फॅँटास्टिक फिल्म्स बनत असतात. मग १९५५ हाच संदर्भबिंदू का? यातही एकच बंगाली वगळता बाकी साऱ्या लोकप्रिय, पुन:पुन्हा पाहावयास मिळणाऱ्या, डी. व्ही. डी. उपलब्ध असणाऱ्या या हिंदी चित्रपटांची ‘किफ’मध्ये भरती का?विविध भारतीजितू जोसेफच्या ‘दृष्यम’ या मूळ मल्याळम व्यावसायिक चित्रपटाच्या आपण निशिकांत कामत दिग्दर्शित हिंदी रिमेकशी परिचित असतो. मात्र अनेकांचा गैरसमज की, हा तमिळ फिल्मचा रिमेक, तर तसे नाही. हा तमिळही रिमेक आणि तो कोल्हापुरात लागूनही गेलाय. अधिक ग्लॅमर असलेल्या श्रीमंत उद्योगाची उत्पादने जास्त पोहोचतात, हेही खरे; पण मूळ आवृत्ती व मोहनलालचा अभिनय जबरदस्त अनुभव.
पिरवी, स्वहम, वानप्रस्थम्सारख्या कलाकृतींचा दिग्दर्शक शाजी करूनचा ‘स्वप्नम’ हा मल्याळम चित्रपट पारंपरिक चर्मवाद्य वाजविणाऱ्या नायकाची कथा मात्र काहीशी ग्लॅमरस होते.‘१ डिसेंबर’ (पी. शेषाद्री) या कन्नड कलाकृतीमधून मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे गरिबांचे जगणे सुधारत तर नाहीच, पण उगाच बिघडते हा संदेश अतिशय सफाईदारपणे दिला आहे.
‘पुन:श्च’ (सोविक मित्रा) ही चांगल्या बंगाली चित्रपटांप्रमाणे कादंबरीच्या लयीत उलगडणारी कलाकृती, नातेसंबंधाकडे निकोप दृष्टीने पाहण्याची शिकवण देते, अतिशय तरलपणे.रजत कपूरचा ‘आॅँखो देखी’ हिंदीच; पण बॉलिवूडपट नव्हे! अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांतून चित्रपट भारतीयांना जोडतो आहे. राज्यघटना आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी भारतीयांच्या एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या. लोकशाही प्रक्रियेतून लोकशाहीविरोधी विचारधारेचे सरकार सत्तेवर. राज्यघटनेच्या व चित्रपटांच्याही मुळावर आघात करण्याचा त्यांचा कृती कार्यक्रम सध्या अजमावून पाहण्याच्या टप्प्यात आहे. असहिष्णुता, एफटीआयआय, सेन्सॉर आणि ‘सेन्सॉरबाह्ण सेन्सॉरशिप’ आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. फॅसिस्टांविरोधी ती चार्ली चॅप्लीननेही घेतली होती. या पार्श्वभूमीवर मार्टीन निमोलरच्या ओळीत काही बदल करून ‘त्यांनी विचारवंतांना मारले, मी काहीच केले नाही, कारण मी विचारवंत नव्हतो.’‘त्यांनी कलाकारांना मारले, मी काहीच केले नाही, कारण मी कलाकार नव्हतो !!’
‘त्यांनी विद्यार्थ्यांना मारले, मी काहीच केले नाही, कारण मी विद्यार्थी नव्हतो !!!आता ते मला मारायला आले आहेत, पण मला वाचवायला कोणीच नाही....’

Web Title: Different types of interstitials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.