दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतू नका : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:22 AM2017-11-30T01:22:28+5:302017-11-30T01:23:47+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा.
कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा. महाडिक कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे, तिथे या, पण काबाड कष्ट करून उभा केलेल्या संघाची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
महाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले, बावड्यातील पोरांना आणून परवा मोर्चा काढला. यामध्ये शंभरही दूध उत्पादक नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला नेत्यांनी दिला होता, पण उत्पादकांसह कर्मचाºयांनी ‘जशास तसे उत्तर’ देण्यासाठी आग्रह केल्याने ७ डिसेंबरला दुपारी बारा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आहोत. अनेक संस्था, संघ, कारखाने बंद पडले ते चालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चांगला चाललेल्या संघाची बदनामी सुरू आहे.
मोर्चाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे किती आले आणि गेले, पण दहा दिवसाला उत्पादकांच्या हातात पैसे देणारा संघ मोडण्याचा घाट आहे, या प्रवृत्तीला विरोध आहे. येथे आलो म्हणून काय भडका उडायचा तो उडू दे, पंपांवर धाडी टाकण्याचे उद्योग केले, आता सहा लाख उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले जात आहे. सुपरवायझरांना फोकलून काढण्याची भाषा केली जाते, हा काय बिहार आहे का? मतभेद असतील त्याचे व्यासपीठ वेगळे आहे. निवडणुकीच्या मैदानात येऊन आरोप करा, असेही महाडिक यांनी सांगितले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, सुरेखा शेगुंनशी, सुजाता जरग, लीला येणेचवंडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक उपस्थित होते.
‘कलम ७८’ची कारवाई मागे
गाय दूध खरेदी दरात कपात केल्याबद्दल सरकारने २५ दूध संघांच्या संचालकांना ‘कलम ७८’च्या नोटिसा काढल्या होत्या; पण सरकारला आपली चूक कळली असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
उसाच्या दराचीही तुलना करा
‘गोकुळ’ राज्यात सर्वाधिक दर देते, तरीही मोर्चा काढता. त्यांच्या कारखान्यात किती दर देता, ‘राजाराम’, ‘बिद्री’त तीन हजार उचल देते आणि यांचा कारखाना २६५० रुपये देतो. शेतकºयांचा एवढाच कळवळा आहे तर तीन हजार रुपये उचल द्यावी, असे महाडिक यांनी सांगितले.