...तर सत्तेत मला गृहीत धरू नका--राहुल आवाडे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:19 AM2017-10-05T01:19:57+5:302017-10-05T01:20:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘जर मी आरोग्य समितीचा अध्यक्ष असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार सुधारण्यासाठी कारवाई होणार नसेल, तर मला तुमच्या सत्तेत गृहीत धरू नका,’ अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना स्पष्ट केले. मात्र तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी त्यासाठी तुम्ही जी पद्धत अवलंबली, ती चुकीची होती. जिल्हा परिषद सदस्यांना कोणत्याही कार्यालयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कार्यालय सील करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत महाडिक यांनीही प्रत्युत्तर दिल्याने बुधवारी स्थायी समितीच्या सभेत शाब्दिक चकमक उडाली.
दुपारी एकनंतर समितीच्या सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक होती. हुपरी येथे ३० सप्टेंबर रोजी कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी झालेल्यांना सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. यावरून संतप्त झालेल्या राहुल आवाडे यांनी रविवारी (दि. १) या केंद्रात भेट देऊन तेथील कागदपत्रे सील केली. त्यांनी अध्यक्षा महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधला; परंतु सुटी असल्याने महाडिक यांनी मंगळवारी प्रत्यक्ष चर्चा करू असे सांगितले. यावरून संतप्त झालेले आवाडे हे स्थायी समितीमध्ये आले.
यावेळी हुपरी आरोग्य केंद्रातील घडलेल्या प्रकाराबाबत आवाडे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. याआधीही तेथील प्रकार मी सभागृहात सांगितला होता. आता पुन्हा रुग्णांना उपचार न करता कोल्हापूरला पाठविण्यात आले. तुम्ही कारवाई करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी महाडिक यांना विचारला. यानंतर महाडिक यांनी शासन आदेश दाखवीत मुळात जिल्हा परिषद सदस्यांना एखाद्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन तेथील कामकाजात हस्तक्षेप करून शासकीय दप्तर सील करता येत नाही. तुमचा हेतू चांगला असला तरी कामाची पद्धत चुकीची आहे, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आवाडे यांचा पारा चढला.
अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करा
राहुल आवाडे म्हणाले, मी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष आहे. या नात्याने या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. अध्यक्ष या नात्याने मी शासकीय दप्तर शासकीय व्यक्तीकडून सील करून घेतले. त्यावर मी, ग्रामस्थ व काही पत्रकारांच्याही सह्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाºयांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. कारवाई होणार नसेल तर मला सत्तेत गृहीत धरू नका, असेही मी सांगितले आहे. मला स्थायीची नोटीसही वेळेत मिळाली नाही. निधी तर मिळतच नाही.
हुपरीतील प्रकार...
हुपरी येथे ३० सप्टेंबरला कुत्रे चावल्याची घटना घडली. यातील जखमींना हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सीपीआर रुग्णालयात पाठवले. याबाबत दुसºया दिवशी राहुल आवाडे यांनी येऊन संबंधित सर्वांची कानउघाडणी केली. तसेच दप्तर सील केले. यावरून हे प्रकरण तापले आहे.
चौकशी समितीची नियुक्ती
याबाबत अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले, आवाडे यांनी हुपरीतील प्रकरणाबद्दल निवेदन दिले. त्यांचे म्हणणे मांडले. कुणावरही तडकाफडकी कारवाई करता येत नाही. त्यामुळे एक एमबीबीएस डॉक्टर, कक्ष अधिकारी आणि अकौंटंट यांची एक चौकशी समिती नेमली आहे. १५ दिवसांत याबाबतचा अहवाल मिळेल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. मुळात कुत्र्यांनी घेतलेला चावा हा ग्रेड तीन प्रकारातील असल्याने त्याला विशेष डॉक्टरांच्या निगराणीखाली अॅँटीरेबीज सिरम इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले होते. ही वस्तुस्थिती डॉक्टरांनी मला सांगितली आहे.