मांगलेत बेंदूर मिरवणुकीत डॉल्बी जप्त
By Admin | Published: July 18, 2016 11:35 PM2016-07-18T23:35:40+5:302016-07-18T23:43:05+5:30
पोलिसांची कारवाई : कारवाईच्या दणक्याने तरुणांच्या उत्साहावर पाणी
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील पारंपरिक बेंदूर उत्सवानिमित्त सोमवारी शेतकऱ्यांनी डॉल्बीच्या निनादात बैलांच्या मिरवणुका काढल्या. मात्र सायंकाळी डॉल्बीच्या आवाजाने मर्यादा ओलांडल्याचे सांगून शिराळा पोलिसांनी मिरवणुका बंद पाडून डॉल्बीचे साहित्य जप्त केले. मिरवणुका पाहण्यासाठी आसपासच्या गावातील तरुण मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.
मांगले येथे बैलांच्या भव्य मिरवणुका काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपत शेतकऱ्यांनी सोमवारी बैलांच्या वाजत-गाजत मिरवणुका काढल्या. बैलांना गोड-धोड खायला घालून मिरवणुकीसाठी सजवले होते. दुपारी तीन वाजता मिरवणुकांना प्रारंभ झाला. सुमारे तीस बैलांचा समावेश असणाऱ्या बाराहून अधिक स्वतंत्र मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरू होत्या. प्रत्येक गाडीपुढे डॉल्बीचा दणदणाट व जल्लोष सुरू होता. मिरवणुका काढणाऱ्या शेतकऱ्यांचा गावातील इतर शेतकरी फेटा बांधून सन्मान करीत होते. मिरवणुका पाहण्यासाठी आसपासच्या गावातील शेकडो तरुण उपस्थित होते. मात्र इस्लामपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे दाखल झाल्यानंतर सर्व मंडळांच्या आवाजाची मर्यादा तपासली. त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे फर्मान सोडल्यामुळे आवाजावर मर्यादा आली. त्यानंतर मिरवणुका शांततेत सुरू झाल्या.
पोलिसांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्व मिरवणुका बंद करण्यास भाग पाडून डॉल्बी जप्त करून शिराळा पोलिस ठाण्यात नेले. काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत तरुण एकत्र येऊन चर्चा करीत होते, तर काही शेतकरी शिराळा पोलिस ठाण्यात चर्चेसाठी पोहोचले होते. (वार्ताहर)
अहवालानंतर कारवाई : वैशाली शिंदे
मांगले येथील मिरवणुकीतील डॉल्बीच्या आवाजाचे उल्लंघन झाले आहे का, हे तपासून तसा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती इस्लामपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांनी सांगितली.
मांगलेची अनेक वर्षांची बेंदूर सणाची परंपरा आहे. ती आम्ही जपत आहोत. मात्र बदलत्या जमान्यात सर्वत्र पारंपरिक वाद्ये कमी होऊन डॉल्बीचा जमाना आला. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आहे. पूर्वी नर्तिकांसह मिरवणुका होत होत्या. आता केवळ वाद्येच असतात. त्यामुळे पोलिसांनी सहकार्य न केल्यास, शेतकऱ्यांचा असणारा हा एकमेव सणही बंद होईल.
- राजेंद्र दशवंत, माजी सरपंच, मांगले.