पन्हाळागडावर दुर्ग स्थापत्य परिषद
By admin | Published: January 6, 2015 11:02 PM2015-01-06T23:02:47+5:302015-01-07T00:07:20+5:30
या परिषदेत दुर्गबांधणीच्या सर्व अंगांची परिपूर्ण चर्चा केली
कोल्हापूर : भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे संजीवन नॉलेज सिटी, तीन दरवाजा पायथ्याजवळ, पन्हाळा येथे दि. १७ ते १८ जानेवारी या कालावधीत दुर्ग स्थापत्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दुर्गअभ्यासक डॉ. अमर आडके यांनी दिली. डॉ. आडके म्हणाले, महाराष्ट्र हा दुर्गांचा प्रदेश होय. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गाथेचे साक्षीदार असणारे हे गडकोट टिकले पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या स्थापत्याचा सर्वांगीण अभ्यास व्हायला हवा, या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत दुर्गबांधणीच्या सर्व अंगांची परिपूर्ण चर्चा केली जाणार असून, नामवंत दुर्ग अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ, अभियंते,भूगर्भशास्त्रज्ञ, वास्तुरचनाकार आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, इतिहास अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे, डॉ. विजय देव, प्रा. जय सामंत, डॉ. अनिलराज जगदाळे, आनंद पाळंदे, प्र. के. घाणेकर, उपस्थित राहणार आहेत.
परिषदेसाठी हिल रायडर्स अॅँड हायकर्स, शिवदुर्ग प्रतिष्ठान, मैत्रेय प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी एन. आर. भोसले, डॉ. बी. डी. खणे, पी. आर. भोसले, प्रमोद पाटील, विजय पाटील, आदी उपस्थित होते.