रस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:55 AM2017-11-27T00:55:20+5:302017-11-27T00:55:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
या विभागातील रस्त्यांच्या स्थितीचा यावेळी पाटील यांनी आढावा घेऊन दर्जेदार कामाचेही अधिकाºयांना आवाहन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. एम. पिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव आर. डी. जोशी, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झाले नाहीत. शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यांत ४० हजार किलोमीटरचे रस्ते होतील. २२ हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील १० हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि ‘भारतमाला’मधून ६ हजार ५०० किलोमीटरचे सहा पदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने २ हजार जणांना पदोन्नती दिली आहे. आणखी १०० जणांना देण्यात येणार आहे; पण २०० जणांना निलंबितही करण्यात आले आहे.
‘दादां’चा वडीलकीचा सल्ला
दिवसातील अर्धा तास तरी स्वत:साठी जगा. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आपआपल्या जीवनसाथीचे म्हणणे नीट समजून घ्या, ऐकून घ्या. सामाजिक उत्तरदायित्व जाणीवपूर्वक जोपासा. संयमाने ऐकण्याची स्वत:ला सवय लावा, समोरच्याचे व्यवस्थित ऐकून घेतल्याने ९० टक्के प्रश्न सुटतात. यातून कार्यालयीन संस्कृतीत विश्वास, जिव्हाळा, एकोपा वाढतो. अशा चांगल्या कार्यसंस्कृतीची आज देशाला गरज आहे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.