सोनाळीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:48 AM2017-08-28T00:48:26+5:302017-08-28T00:48:29+5:30

Eco-friendly Ganeshotsav in Sonalat | सोनाळीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

सोनाळीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

Next



निवास वरपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणारे करवीर तालुक्यातील सोनाळी हे गाव. गेली सत्तर वर्षे अखंडितपणे या गावात रंगविरहित गणेशमूर्ती घरोघरी बसवल्या जातात. गावातील तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीही रंगविरहित अशा शाडू मातीच्याच आहेत. गेली काही वर्षे डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थित विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील ग्रामस्थांनी चालवली आहे.
शेतीबरोबर दुग्ध उत्पादन हा सोनाळीच्या ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने या गावाला शासकीय सोयी-सुविधांचा अभाव आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक शेती कोरडवाहू आहे. १७२० लोकसंख्या असलेल्या सोनाळीत ग्रामपंचायत, दोन सेवा संस्था, तीन दूध संस्था व दोन तरुण मंडळे आहेत. तरुणांनी पांरपरिक वाद्याची कला जोपासली असून, मंडळाच्या माध्यमातून झांजपथक, ढोल-ताशे, लेझीम मंडळ व भजनी मंडळ चालवली आहेत.
सोनाळीचे मुख्य ग्रामदैवत ‘धाकेश्वर’ असून, गावात हनुमान व मरगुबाई देवीची मंदिरे आहेत. येथे ज्ञानेश्वरी पारायण, दसरा महोत्सव व महाशिवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसवलेला चालत नाही, अशी आख्यायिका आहे. देवाचा कोप होऊ नये या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या मूर्ती बसवतच नाहीत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया या गावाचे नाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे. या गावात रंगीत गणेशमूर्ती बसवल्या जात नसल्याचे पंचक्रोशीला परिचित असल्याने गावातील युवकांनी याचा आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘धाकेश्वर’ व ‘जयशिवराय’ या दोन्ही तरुण मंडळांनी गेली वीस वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव इको फ्रेंडली व पर्यावरणपूरक असा साजरा करण्याची प्रथा चालवली आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व वयोवृद्ध मंडळी गौरी गणपतीच्या सणावर विशेष लक्ष देऊन असतात. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्याने, महाप्रसाद व प्रबोधनांचे आयोजन केले जाते. महिलांनी गौरी आवाहन व विसर्जनादरम्यान जुन्या रीतीरिवाज, परंपरा संभाळत प्रदूषणमुक्तीचा वसा निर्माण केला आहे.
शेजारील म्हालसवडे गावातील कुंभार बलुतेदारी पद्धतीने शाडू मातीच्या गणेशमूर्ती संपूर्ण सोनाळी गावाला पुरवतात. येथे सव्वाशे घरगुती व दोन तरुण मंडळांच्या शाडू मातीच्या व रंगविरहित गणेशमूर्ती आहेत. सोनाळी गाव पर्यावरणपूरक व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरे करत असल्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यायला हवा. करवीर पोलिसांनी या गावाचे विशेष कौतुक केले आहे.

Web Title: Eco-friendly Ganeshotsav in Sonalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.