मल्टिस्टेटची धग धुमसणार! ‘मल्टिस्टेट’चे झटके लोकसभा-विधानसभेतही बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:59 AM2018-10-02T10:59:48+5:302018-10-02T11:06:48+5:30

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पाठिंबा देणारे संस्थांचे ठराव गोळा करण्यात सत्तारूढ गटाने बाजी मारली असली, तरी रविवारी झालेल्या वार्षिक सभेत मात्र विरोधकांनी थेट सभेतच दिलेली धडक सत्तारूढ गटाला धडकी भरवणारी ठरली;

The fade of the multicast smile! Goku Analysis: | मल्टिस्टेटची धग धुमसणार! ‘मल्टिस्टेट’चे झटके लोकसभा-विधानसभेतही बसणार

मल्टिस्टेटची धग धुमसणार! ‘मल्टिस्टेट’चे झटके लोकसभा-विधानसभेतही बसणार

Next
ठळक मुद्दे‘मल्टिस्टेट’चे झटके लोकसभा-विधानसभेतही बसणारविरोधकांची धडक सत्तारूढांना धडकी भरवणारी

- विश्र्वास पाटील - 

कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पाठिंबा देणारे संस्थांचे ठराव गोळा करण्यात सत्तारूढ गटाने बाजी मारली असली, तरी रविवारी झालेल्या वार्षिक सभेत मात्र विरोधकांनी थेट सभेतच दिलेली धडक सत्तारूढ गटाला धडकी भरवणारी ठरली; त्यामुळे मल्टिस्टेटचा विरोध यापुढेही तीव्र होणार असून, या विषयाभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत राहणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही त्याचे झटके बसणार आहेत.

गोकुळ’ दूध संघ हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असल्याने त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठीची लढाई असेच ‘मल्टिस्टेट’च्या विरोधामागील खरे राजकारण आहे. गेली जवळपास ३0 वर्षे या संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या राजकारणाला या संघाच्या आर्थिक व संस्थात्मक पाठबळाचाही मोठा फायदा झाला आहे. किंबहुना त्यांच्या राजकीय वर्चस्वाचा गोकुळची सत्ता हाच पाया आहे.

ज्यांच्याकडे संस्थांचे ठराव आहेत, अशा मातब्बर संचालकांना एकत्र करून सत्तेची मोट बांधण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यात त्यांचाही फायदा आहे व संचालकांचाही; त्यामुळे संघाच्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशी रणनीती वापरून सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न होतो. तसाच प्रयत्न आता मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी झाला. म्हणूनच गेली दीड महिना सत्तारूढ गट हा ठराव मंजूर करण्यासाठी राबत होता.

संघाची सर्व यंत्रणा, महाडिक व पी. एन. पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते व सर्व संचालकांनी आपल्या जीवनमरणाचा प्रश्न म्हणून या घडामोडींकडे पाहिले; त्यामुळे ठराव ‘मंजूर... मंजूर...’ म्हणण्यात सत्तारूढ गटाने यश मिळविले असले, तरी विरोधक थेट सभेत येऊन भिडल्याने ‘गोकुळ’ची लढाई संपलेली नाही आणि ती सोपीही नाही, हेच रविवारी स्पष्ट झाले. विरोधक प्रवेशद्वारावर समांतर सभा घेऊन निघून गेले असते, तर मात्र सत्तारूढ गटाचा तो मोठा विजय ठरला असता; पण तसे घडले नाही व त्यांनी थेट सभामंडपातच धडक दिली.

मल्टिस्टेटचा विरोध सभेच्या पटलावर येऊन मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. आता या ठरावाचे पुढे काय होणार हा गुंतागुंतीचा विषय असला, तरी तो सहजासहजी मंजूर होणार नाही यासाठीची लढाई सुरुच राहणार आहे.
गोकुळमधील या घडामोडींचे राजकीय पडसादही तितकेच तीव्रपणे उमटणार आहेत. या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या खासदार मैदानात उतरल्याचे दिसले. या लढाईत सगळी राष्ट्रवादी त्या पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यामागे उभी राहिली असताना चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर मात्र कुठेच दिसल्या नाहीत.

शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार संजय घाटगे हे सत्तारूढांच्या बाजूने, तर त्यांच्या पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक, आमदार उल्हास पाटील हे विरोधात राहिले. काँग्रेसचे दोन मातब्बर नेते पी. एन. पाटील व सतेज पाटील हे एकमेकांच्या विरोधात ठाकले. दोेन्ही काँग्रेसवाल्यांतील ही भांडणे पाहण्यात भाजपने आनंद मानला. खासदार राजू शेट्टी यांनीही संघाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. महाडिक पडद्याआड राहून संघटनेच्या वर्चस्वाला व शेट्टी यांच्या खासदारकीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याची ती प्रतिक्रिया होती. महाडिक यांनी गोकुळमधील सत्तेसाठी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतील सारेच नेते अंगावर घेतल्याचे चित्र पुढे आले.

हा महाडिक जिल्ह्याच्या राजकारणात पाय रोवून घट्ट उभा आहे, असा त्यांचा आत्मविश्वास आहे; त्यामुळे संभाव्य परिणामांची फिकीर न बाळगता ते मैदानात उतरले. मला कोण रोखू शकत नाही, असाच काहीसा त्यांचा व्यवहार राहिला; परंतु कोल्हापूरच्या राजकारणाचा बाज वेगळाच आहे. अशीच भावना २००९ च्या निवडणुकीत शरद पवार यांचीही झाली होती तेव्हा कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी त्यांनाही धडा शिकवला होता. लोकभावनेला विरोध करून जेव्हा एखादी गोष्ट लादली जात आहे, अशी लोकांची भावना होते, तेव्हा कोल्हापूरचा फाटका माणूस त्वेषाने उठतो हा इतिहास आहे. तो टोल आंदोलनातही उजळला आहे याची महाडिक यांनी आठवण ठेवलेली बरी.
मल्टिस्टेटच्या निमित्ताने जे राजकारण झाले ते संघाच्या वाटचालीवर परिणाम करणारे आहे. काही चुकीच्या गोष्टीही घडल्या आहेत. संघाचे व्यवस्थापकीय संचालक हे अराजकीय पद आहे; परंतु या लढाईत त्यांनीही सत्तारूढ गटाची बाजू घेऊन मल्टिस्टेट करणे कसे हिताचे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही संस्थेचे प्रशासन कायमच सत्तारूढांबरोबर असते; परंतु त्याने थेट एका गटाची बाजू घेणे हे योग्य नव्हे. कर्नाटकांतून म्हशीचे दूध आणण्यासाठी आम्ही मल्टिस्टेट करत आहोत, असे संघाचे म्हणणे होते; परंतु हे दूध आजही आणले जाते, त्याला कुणीच विरोध केलेला नाही याकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. सभा झाल्यानंतर महाडिक यांनी विरोधकांना मल्टिस्टेटचा ठराव मंजूर नसेल, तर त्यांनी वेगळी चूल मांडावी व दुसरा दूध संघ काढावा किंवा महालक्ष्मी दूध संघ चालू करावा, अशी सूचना केली आहे. ती तर अधिक गंभीर असून संघाच्या मुळावरच उठणारी आहे.

‘महालक्ष्मी’ चा अनुभव वेदनादायीच..
महाडिक हे काय संघाचे आजन्म मालक नाहीत व मल्टिस्टेटच्या विरोधात उतरलेले नेते हे संघाचे विरोधक नाहीत. त्यांनी दुसरा संघ काढायचा ठरविल्यास गोकुळचे काय होईल याचे भान बाळगण्याची गरज आहे. कागल तालुक्यातील मंडलिक-मुश्रीफ यांच्या राजकीय वादात महालक्ष्मी दूध संघाचे असेच अस्तित्व संपुष्टात आले हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

नरकेंचे मेरिट
शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दाखविलेला आक्रमकपणा ‘करवीर’ च्या लढाईत त्यांचे मेरिट नक्कीच वाढवणारा आहे. या मतदारसंघातील आगामी लढत किती चुरशीची असू शकेल, याचीच झलक गोकुळच्या राजकारणात पाहायला मिळाली.
 

Web Title: The fade of the multicast smile! Goku Analysis:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.