‘फेक न्यूज : सत्यता पडताळूनच बातमी शेअर करा : विनायक पाचलग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:10 PM2018-08-02T13:10:42+5:302018-08-02T13:17:58+5:30
समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करूनच ती पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी केले.
कोल्हापूर : समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करूनच ती पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हास्तरीय सायबर सेल आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलीस उपअधीक्षक सतीश माने, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने उपस्थित होते.
पाचलग म्हणाले, ‘देशात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण २७ टक्के असून ते झपाट्याने वाढत आहे. देशातील २२ कोटी लोक फेसबुक, तर १७ कोटी जनता व्हॉटस्अपचा वापर करतात. समाजकंटक आपला हेतू साध्य करण्यासाठी या समाज माध्यमांचा वापर करतात.
सोशल मीडिया वापरणारी व्यक्ती पोस्टची सत्यता पडताळत नाहीत; त्यामुळे समाजात संभ्रमाची अवस्था निर्माण होते. सोशल मीडियाचा वापर करताना थिंक व्टॉईस हा मंत्र अवलंबणे गरजेचे आहे. अशा पोस्टची त्या-त्या क्षेत्रांतील तज्ञांंकडून सत्यता पडताळल्यास फेक न्यूज रोखणे शक्य आहे.
सतीश लळीत म्हणाले,‘सामाजिक सलोखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेक न्यूज रोखणे अवघड असले, तरी त्या शेअर न करणे शक्य आहे.’ जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी स्वागत केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अंबऋषी फडतरे यांनी परिचय करून दिला. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी आभार मानले.