शेतकरी संघ कोणत्याही चौकशीस तयार : युवराज पाटील
By admin | Published: June 21, 2017 04:26 PM2017-06-21T16:26:11+5:302017-06-21T16:26:11+5:30
बदनामी न करता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २१ : शेतकरी सहकारी संघाचा कारभार पारदर्शक असतानाही केवळ राजकीय द्वेषापोटी संचालक मंडळावर बिनबुडाचे आरोप करून संघाची बदनामी सुरू आहे. आम्ही केलेला कारभार पारदर्शक असल्याने कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकातून दिली.
गेली पंधरा दिवस संघाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. काही विघ्नसंतोषी आजी-माजी संचालकांकडून हे सूडबुद्धीने बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी संघाचा अमृतमहोत्सव साजरा होऊनही एक कोटींचा नफा झाला. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे दीड कोटी, ग्रॅच्युईटीचे एक कोटी दिले. त्याशिवाय अमृतमहोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना एक पगार बक्षीस दिला.
व्यवस्थापकपदासाठी रितसर जाहिरात देऊन अर्ज मागविले पण त्यामध्ये एकही पात्र उमेदवार नव्हता. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत आप्पासाहेब निर्मळ यांची निवड केली. त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत आणि त्यांना निलंबितही केलेले नाही.
आरोप करत सुटलेल्या संचालकांनीही दोन वर्षांच्या कारभारात अनेक निर्णयांबाबत आपली सहमती दर्शविली आहे. त्याचबरोबर संघाच्या लौकिकात भर पडण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या सुचनांची अंमलबजावणी संचालक मंडळाने केली आहे. काम करत असताना काही मतभेद असू शकतात; पण त्याचा बाऊ करून बदनाम करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढता येईल, असे आवाहन अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, संचालक जी. डी. पाटील, विजयकुमार चौगले, व्यंकाप्पा भोसले, अमरसिंह माने, आण्णासाहेब चौगले, यशवंत पाटील, शशिकांत पाटील, विनोद पाटील, बाळकृष्ण भोपळे, सुमित्रादेवी शिंदे यांनी पत्रकातून केले.
मानसिंगरावांच्या काळात संघ तोट्यात!
आता आमचा कारभाराची मापे काढणारे संचालक मानसिंगराव जाधव हे व्यवस्थापक असताना संघ पाच लाखांने तोट्यात होता. त्यांची नेमणूकच बेकायदेशीर ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. शोभना नेसरीकर यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. त्यातच संघाच्या कर्मचाऱ्यांचा राबता बंद झाल्याचे दु:ख त्यांना असावे, त्या निराशेपोटी त्या आरोपात सामील झाल्या असाव्यात, अशी टीका पाटील यांनी केली.