शिरोळ तालुक्यातील कॅन्सरची भीती अनाठायी¨; सूरज पवार : जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:11 AM2018-07-06T00:11:11+5:302018-07-06T00:16:16+5:30
कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे,
कोल्हापूर : कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. सूरज पवार यांनी सोमवारी (दि. २) येथे केले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे आयोजित ‘कॅन्सर-समज व गैरसमज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर होते. डॉ. पवार म्हणाले, कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगातील इंग्लंड, अमेरिका, आदी देशांमध्ये झालेल्या संशोधनात कुठेही सिद्ध झालेले नाही. जगभरातील ९० टक्के शोधनिबंधांमध्ये याबाबत स्पष्टता नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत असल्याचा शास्त्रीय, ठोस पुरावा नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. शिरोळ तालुक्यामध्ये खरोखर कॅन्सरचे प्रमाण जादा असल्याचे आणि त्याला कीटकनाशकाचा अतिवापर कारणीभूत असल्याचा शास्त्रीय पुरावा नाही. याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिरोळमधील कॅन्सरचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लोकसंख्येवर आधारित आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
डॉ. सुभाष आठले म्हणाले, कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधित संभाव्य यादीत कीटकनाशकांचा अंतर्भाव नाही. प्रमाणाबाहेर कीटकनाशके पोटात गेली, तर त्याचे अन्य दुष्परिणाम आहेत. पण, पिकांवर कीटकनाशके वापरली म्हणून कॅन्सर होतो हे म्हणणे चुकीचे आहे.
उलट कीटकनाशकांमुळे भारतात हरितक्रांती झाली. ज्येष्ठ वनस्पतिशास्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर म्हणाले, विकास साधण्याबरोबरच पर्यावरणाचा तोल सांभाळला जावा.या चर्चासत्रास प्रभाकर मायदेव, सचिन घाटगे, सुधीर हंजे, बृहस्पती शिंदे, आदी उपस्थित होते. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी आभार मानले.
लवकरच विशेष तपासणी मोहीम
कोल्हापूर कॅन्सर सेंटरकडे नोंद झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता शिरोळ तालुक्यातून येणाºया रुग्णसंख्येत वाढ असल्याचे आढळून येत नसल्याचेडॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि जिल्हा परिषदेतर्फे शिरोळ तालुक्यात कॅन्सरबाबतची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.