राज्यातील पहिली आॅनलाईन सैन्यभरती सुरू
By admin | Published: February 4, 2016 01:10 AM2016-02-04T01:10:06+5:302016-02-04T01:10:06+5:30
५७ हजार जणांची नोंदणी : कोल्हापुरात पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांची हजेरी; जिल्हानिहाय भरतीला प्रतिसाद
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात बुधवारी पहाटे प्रारंभ झाला. राज्यातील पहिल्याच जिल्हानिहाय आॅनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने तब्बल ५७ हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांनी हजेरी लावली.
भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यासाठी २० फेब्रुवारीअखेर भरती मेळावा होईल. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन ही पदे आहेत.
बुधवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. सायबर चौकाजवळील शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून उमेदवारांना प्रवेश देण्यात येत होता. या ठिकाणी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जात होता. या प्रवेशद्वारापासून मैदानापर्यंत दोन्ही बाजूंना बॅरिकेटस् लावून एका रांगेतून उमेदवारांना सोडण्यात येत होते. या ठिकाणी त्यांची आॅनलाईन नोंदणी कोणत्या पदासाठी केली आहे, हे पाहून उमेदवारांना धावण्याच्या चाचणीसाठी पुढे पाठविण्यात आले. सुमारे १२० ते १२५ मुलांचे गट करून धावण्याच्या प्रक्रियेसाठी पाठवून चाचणी घेण्यात येत होती. ती ठराविक वेळेत जे उमेदवार पार करीत होते, त्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात येत होती. या ठिकाणी कागदपत्रे तपासून पुढे त्यांच्या पुलअप्स् काढण्याची चाचणी घेण्यात येत होती. यानंतर पुन्हा एकादा बायोमेट्रिक घेऊन प्रत्येकाची उंची, वजन, छाती यांचे मोजमाप करून आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. या सर्व प्राथमिक फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची रविवारी (दि. ७) वैद्यकीय तपासणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आज, गुरुवारी सांगली जिल्ह्यासाठी सैन्य मेळावा होणार आहे.
भरतीच्या जिल्हानिहाय तारखा
आजपासून ६ फेब्रुवारीपर्यंत : सांगली
७ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी
८ व ९ फेब्रुवारी : सोलापूर
१० ते १२ फेब्रुवारी : कोल्हापूर
१३ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी
१४ फेब्रुवारी : सिंधुदुर्ग व गोवा
१५ ते १७ फेब्रुवारी : सातारा
१८ ते २० फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी
भरतीसाठी एसटीकडून जादा गाड्या
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिल्या दिवशी भरती प्रक्रिया होणार असल्याने महामंडळाच्यावतीने जादा आठ गाड्यांचे नियोजन केले होते. रत्नागिरी येथून थेट भरती प्रक्रिया सुरू असलेल्या विद्यापीठातील भरती ठिकाणापर्यंत गाड्यांची विशेष सोय केली होती. तसेच ‘केएमटी’तर्फे मध्यवर्ती बसस्थानक ते भरती मेळावाच्या ठिकाणी व पुन्हा परत मध्यवर्ती बसस्थानक अशा दोन विशेष गाड्यांची सोय होती. तसेच या मार्गावरील १९ गाड्यांमार्फत उमेदवारांची ने-आण करण्यात येत होती.