कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 07:20 AM2018-02-19T07:20:16+5:302018-02-19T12:09:20+5:30

शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते.

Five people were killed on the spot and 25 injured when they were carrying Shivajyot | कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्देशिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यूतिघेजण अत्यवस्थ, १९ जखमी

कोल्हापूर/शिरोली : पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टॅम्पोला दहाचाकी कॅन्टरने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे.  यातील तीन जण अत्यवस्थ अवस्थेत असून सुमारे 19  जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथे घडला. पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणल्यानंतर या पाचहीजणांवर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी टॅम्पो केला होता. टॅम्पोमध्ये सुमारे ३८ विद्यार्थी होते. सांगलीला परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच टॅम्पो कलंडला. त्याखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. 

प्रविण शांताराम तिरलोटकर ((वय २३, रा.टाटा कॉलनी, चेंबूर मुंबई), सुशांत विजय पाटील(वय २२), केतन प्रदीप खोचे (वय २१, दोघे रा. तासगांव, सांगली), अरूण अंबादास बोंडे ((वय २२, रा. रामगाव बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (वय २३, पिरळे , शाहुवाडी) हे पाच तरुण ठार झाले तर मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ आणि तन्मय वडगावकर, हे तिघेजण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सांगली येथील वालचंद महाविद्यालयातील ४१ विद्यार्थी शिवज्योत आणण्यासाठी रविवारी टॅम्पोमधून गेले होते. रात्री पन्हाळगड येथे ते पोहोचले. पहाटे अडीच वाजता पन्हाळगडावरील शिवमंदिरातून ज्योत घेऊन ते सर्वजण बाहेर पडले. कोडोली-वाठार मार्गे ते महामार्गावरून येत होते. यातील एकजण शिवज्योत घेऊन रस्त्यावरुन धावत होता, तर टॅम्पोमध्ये सुमारे ३८ जण बसले होते. त्यांच्यातील चौघेजण दुचाकीवर बसले होते.

पहाटे साडेचार वाजता शिरोली एमआयडीसी येथील पहिला फाटा , आंबेडकर नगर येथे ते सर्वजण आले असता एका दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे चौघेजण थांबून दुसऱ्या दुचाकीतील पेट्रोल काढत होते. यावेळी मागून आलेला टेम्पोही थांबला. याचवेळी या थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. थांबलेला टेम्पोही उलटला. हा अपघात इतका भयंकर होता की यामधील तीन तरुण जागीच ठार झाले. त्यांचा मेंदू रस्त्यावर पडलेला होता. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले आहेत.

या अपघातात गंभीर जखमी झालेले मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ, तन्मय वडगावकर हे तिघेजण अत्यवस्थ असून प्रणव देशमाने, निलेश तुकाराम बारंगे, धर्मेंद्र पाटील, आदीत्य कोळी, साजीत कनगो, अविनाश रावळ, सुभाष सखर, हर्ष सुभाष इंगळे, प्रणव मुळे, नदीम शेख, संगा शेरपा, रविंद्र नरूटे, शिवकुमार शिराटे, यश रजपुत, ऋषिकेश चव्हाण, गुंडु पटेकरी, प्रतिक सपकाळ, प्रितम सावंत, राहुल शशिकांत सुतार असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मृत सुशांत विजय पाटील
 

Web Title: Five people were killed on the spot and 25 injured when they were carrying Shivajyot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.