शहरातील दुर्मीळ वृक्ष संवर्धनाचा वसा
By admin | Published: April 23, 2015 12:02 AM2015-04-23T00:02:58+5:302015-04-23T00:37:31+5:30
वसुंधरा दिनाचा उपक्रम : ३५० वृक्षांना लावणार फलक; नागरिकांतून करणार जागृती
कोल्हापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला बागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कृषी विद्यापीठ परिसर, शेतवड, आदी ठिकाणी तब्बल ४० दुर्मीळ जातींचे ३५० वृक्ष दुर्लक्षित आहेत. या सर्व दुर्मीळ वृक्षांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड व अनिल चौगुले यांच्या पुढाकारातून बुधवारी ‘वसुंधरा दिना’चे औचित्य साधत फलक लावण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. यामुळे शहरातील दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनाचा वसा सुरू झाला.
लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयाच्या दारात ‘रत्नकुंज’ या जातीचे शहरातील एकमेव झाड आहे. अशा प्रकारचे गोरखचिंच, सीता अशोक, कदंब, हनुमानफळ, टेंभुर्णी, बारतोंडी, सुकाणू, सातवी, जारूळ, टेठू, गोंदणी, चेसनेट, कापूर, अमृतफळ, करंबळी असे अनेक दुर्मीळ वृक्ष दुर्लक्षित आहेत. यातील अनेक वृक्ष शहरात एक किंवा दोनच आहेत. ही झाडे काही कारणांनी तोडली गेल्यास शहरातून त्यांचे अस्तित्वच संपणार आहे.
शहरातील दुर्मीळ अशा ४० जातींच्या ३५० वृक्षांचे ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले व विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी संवर्धन करण्याचे ठरविले आहे. या वृक्षांना त्यांचे नाव व संरक्षित वृक्ष असा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे या वृक्षांचे महत्त्व शहरवासीयांना समजेल. या वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांचे संवर्धन केले जाईल. अशा वृक्षांची काळजी घेऊन त्यांची वाढ केली पाहिजे, ही भावना शहरवासीयांत रुजेल, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे अनिल चौगुले यांनी स्पष्ट केले.
या दुर्मीळ वृक्षांना फलक लावण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, टाउन हॉल येथील दुर्मीळ वृक्षांना आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते असा फलक लावून या उपक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)