मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे : सिंधुताई
By admin | Published: December 30, 2014 09:21 PM2014-12-30T21:21:34+5:302014-12-30T23:39:44+5:30
ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा
राशिवडे : ग्रामीण भागातील महिला खऱ्या अर्थाने सबला आहेत. कारण त्यांना समोरच्या पुरुषाच्या नजरेत काय चाललंय हे ओळखता येते. मुलींना स्वातंत्र्य जरूर मिळाले पाहिजे, पण मुलींनाही समजायला हवे की मला ‘मादी’ व्हायचे आहे की ‘माय’, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथील नवकवी दत्तात्रय महिपती दुरुगले यांच्या ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. दत्तात्रय दुरुगले लिखित ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी बालकवी शाम कुरळे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी शरद काटकर राधानगरीचे पोलीस निरीक्षक ए. आर. गाडे, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मोरे, सरपंच मालुताई बरगे, उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी उपस्थित होत्या.सपकाळ म्हणाल्या, महिलांनीच कसे वागवे हे ठरविले पाहिजे. अंग प्रदर्शन करणारे कपडे आपल्या मुलांना देऊच नयेत. युवकांना उद्देशून त्या म्हणाल्या, बाबांनो, पुढे जा. मात्र, मागे वळून पहा, येऊ द्या संकट, येऊ द्या दु:ख, काट्यावरून चालताना तीही एक दिवस फुले बनतील. ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. आर. पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पुंगाव येथे ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, शरद काटकर, डी. व्ही. मोरे, शाम कुरळे, आदी उपस्थित होते.