गोकुळ दूध संघाची गवळ्याचीच भूमिका : उपपदार्थांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:04 AM2018-06-24T01:04:55+5:302018-06-24T01:05:39+5:30
एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने ‘गोकुळ’च्या ब्रँडलाही मर्यादा आल्या असून परिणामी गायीच्या अतिरिक्त दुधाचे संकट उभे राहिले आहे.
‘गोकुळ’ने प्रत्येक वर्षी दूधवाढीचा संकल्प करून त्यादृष्टीने कृती कार्यक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे संघाने ठरविल्याप्रमाणे दूध वाढत गेले. जातिवंत दुभत्या जनावर खरेदीसाठी संघाने अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले; पण सगळ्यात प्रभावी ठरली ती ‘वासरू संगोपन’ योजना, या योजनेतून लाखो दुभती जनावरे शेतकºयांच्या गोठ्यातच तयारी झाल्याने आपोआपच दूध वाढत गेले.
भाकड काळ कमी, त्यात गायीचे वासराचे चांगले संगोपन झाले तर साधारणत: दीड वर्षांत गाभण जात असल्याने म्हशीच्या तुलनेत योजनेतील गायीचे दूध लवकर सुरू झाले.साधारणत: पाच-सहा वर्षांपासून दूध वाढत गेले, ‘गोकुळ’ने वाढलेल्या दुधाचे ब्रँडिंग केले पण हे करत असताना उपपदार्थ निर्मितीकडे दुर्लक्ष केले. एकूण संकलनापैकी केवळ ५ ते १० टक्केच उपपदार्थ केले जातात. म्हैस दुधाला बाजारात मागणी असल्याने त्याचे ठीक होते, पण वाढणाºया गायीचे दूध कुठे मुरवायचे, याचे नियोजन वेळेत होणे गरजेचे होते. स्वर्गीय वर्गीस कुरियन यांनी ‘दूध घरात नेण्याअगोदर ब्रँड घरात न्या,’ अशी सूचना ‘गोकुळ’ला केली होती. संघाने दुधाचा ब्रँड विकसित केला पण उपपदार्थांकडे दुर्लक्षानेच हा पेच निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
याउलट ‘अमूल’चे रोज दीड कोटी लिटर दूध संकलन आहे. त्यातील ८५ लाख लिटर लिक्वीडमध्ये विक्री होते तर उर्वरित दुधाचे उपपदार्थ केले जातात. गुजरातमध्येही म्हशीबरोबर गायीचे दूध आहे, पण त्यांनी उपपदार्थांचा ब्रँड विकसित केला. गायीच्या दुधापासून टेबल बटर तयार करतात. दिल्लीत महिन्याला ७०० टन टेबल बटरची विक्री होत असल्याने गायीच्या दुधाचा त्यांना प्रश्नच भेडसावत नाही. (पूर्वार्ध)
पंधरा वर्षांपूर्वी २० टक्केच गायीचे दूध
साधारणत: १९९० ते २००० या कालावधीत ‘गोकुळ’च्या एकूण संकलनात ८० टक्के म्हशीचे तर २० टक्के गायीचे दूध होते. त्यानंतर हळू-हळू गायीचे दूध वाढत गेले आणि आज हेच प्रमाण ५० : ५० टक्क्यांवर आले आहे.
लिक्वीड विक्री फायद्याची संकलन केलेले दूध प्रक्रिया करून थेट विक्री केली तर त्यातून फायदा अधिक होतो. उपपदार्थ तयार केले तर कष्ट अधिक आणि मार्जिन कमी असल्याने संघाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या उपपदार्थांचा ब्रँड विकसित होऊ शकला नाही.