कोल्हापूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जीएसटी, कर्जमाफीवरून राजकीय खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:43 PM2017-12-13T13:43:42+5:302017-12-13T13:47:58+5:30
भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले.
कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले.
सभा सुरू होऊन अर्धा तास झाल्यानंतर भगवान पाटील यांनी अंगात बॅनर घालून त्यावर पाठीमागे जिल्हा परिषदेची रिकामी तिजोरी दाखविली होती; तर पुढच्या बाजूला मजकूर लिहिला होता, निवडणुकीवेळी भाजपने अनेक आश्वासने दिली. मात्र आता निधीमध्ये ३० टक्क्यांची कपात केली आहे. कर्जमाफीमध्येही शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. कृषी अवजारांवर जीएसटी लावला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच ‘कितना बदल गया इन्सान’ असे म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
यावर लगेचच पक्षप्रतोद विजय भोजे सरकारच्या समर्थनार्थ उठले. दोन्ही कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने संपूर्ण देशासाठी ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र केवळ महाराष्ट्रात ३२ हजार कोटींची कर्जमाफी झाली. तुमचा गैरसमज झालाय. ५० वर्षांत जे तुमच्या सरकारला जमले नाही ते या सरकारने केले. शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी शून्य टक्के दराने पैसे दिलेत. निधी मिळणार आणि पुढच्या बैठकीला तुम्हांला हे अंगातील पोस्टर बदलावे लागणार, असे पाटील यांना ठणकावून सांगितले.
गटनेते अरुण इंगवले यांनीही आक्रमक भाषेत पाटील यांना विरोध केला. पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही राजकीय रंग आणला आहे. मोदींचं सरकार आल्यापासून अनेकांच्या पोटात गोळा आलाय. मीही राष्ट्रवादीत होतोे. राज्य कर्जात बुडालं असताना शेतकऱ्यांसाठी म्हणून कर्जमाफी दिली.
याआधीच्या कर्जमाफीवेळी एक एकर शेती असणाऱ्याला दीड कोटी रुपये दिले गेले. करवीर तालुक्यात भ्रष्टाचार करून कर्जमाफी घेतली; म्हणून सदाशिराव मंडलिक यांनी त्याला विरोध केला. नागपूर अधिवेशनानंतर कात्री लावलेला निधीही परत मिळणार आहे. हा केवळ राजकीय विरोध आहे.
इंगवले बोलत असताना कॉँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांनी त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. ‘तुम्ही त्या कारभारात सहभागी होता ना?’ अशी विचारणा त्यांनी केली. ‘हे बोलणं बरोबर नाही’ असे त्यांनी निक्षून सांगितले. तेव्हा इंगवले यांनीही ‘त्यांना पक्ष सोडला म्हणूनच बोलतोय’ असे सांगितले.
प्रसाद खोबरे म्हणाले, राजू शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो आणि आता जर शेट्टी भाजपला शिव्या देत असतील तर त्याला इलाज नाही. या खडाजंगीमुळे सभागृहातील वातावरण तापले. अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी या विषयावर पडदा पाडत पुढचा विषय सुरू केला.
राजकारणातूनच दोन तालुके वगळले का?
सदस्या वंदना जाधव यांनी नंतरच्या चर्चेत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठविले असतानाही राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यांतील प्रस्ताव का मंजूर झाले नाहीत? का राजकारणातून आमचे तालुके वगळले असा थेट प्रश्न विचारला. गगनबावड्याचे सदस्य बजरंग पाटील यांनीही हाच प्रश्न यावेळी उपस्थित केला.