Guru Purnima : कोल्हापूर : प्रतिकूलतेवर मात करून घडले औद्योगिक ‘भूषण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 03:23 PM2018-07-27T15:23:17+5:302018-07-27T15:25:37+5:30
ऐन महाविद्यालयीन शिक्षणावेळी विस्कटलेली घरची आर्थिक घडी, वडिलांचे हरविलेले छत्र, त्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजक भूषण जयंतीलाल गांधी हे घडले. अमेरिकन नौदलाने एप्रिल २०१८ मध्ये त्यांना ‘इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड फॉर क्वालिटी मॅनेजमेंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यामुळे जागतिक औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूरची नवी ओळख निर्माण झाली.
संतोष मिठारी
कोल्हापूर : ऐन महाविद्यालयीन शिक्षणावेळी विस्कटलेली घरची आर्थिक घडी, वडिलांचे हरविलेले छत्र, त्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजक भूषण जयंतीलाल गांधी हे घडले. अमेरिकन नौदलाने एप्रिल २०१८ मध्ये त्यांना ‘इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड फॉर क्वालिटी मॅनेजमेंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यामुळे जागतिक औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूरची नवी ओळख निर्माण झाली.
मूळचे राजस्थानचे असणाऱ्या भूषण यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना अचानकपणे त्यांच्या वडिलांचे सराफी व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे घरची आर्थिक घडी विस्कटली. त्यावर उच्च शिक्षण कसे पूर्ण करावयाचे असा प्रश्न भूषण यांच्यासमोर उभा राहिला.
अशा बिकट स्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांकडून मदत मिळवून त्यांनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे येथून मेटॅलर्जी अभ्यासक्रमाचे उच्च शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांना संरक्षण क्षेत्रासाठी केमिकल उत्पादन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली.
नोकरीच्या माध्यमातून जगभरात भ्रमंती करताना या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती घेतली. पुढे स्वत:चा उद्योग सुरू करून करिअर घडविण्याच्या दिशेने पाऊल टाकताना त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरविले. त्यावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत भूषण हे कार्यरत राहिले. त्यांनी चारचाकी वाहनांमधील एअर बॅग, संरक्षण दलातील उत्पादनांसाठी आवश्यक असणाऱ्या झिरकोनियम, टिटानियम हायड्रेड पावडरचे उत्पादन, पुरवठा हा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतून सुरू केला.
आता जगभरातील १६ देशांना या पावडरची निर्यात करीत आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन जागतिक बँकेने त्यांची सन २००५मध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या पावडर निर्मिती क्षेत्रात मक्तेदारी असणाऱ्या जर्मनीच्या पुढे पाऊल टाकून त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण दलाकडून झालेली या पावडरची मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. याबद्दल अमेरिकेच्या नौदलाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात झाल्यापासून प्रतिकूल परिस्थितीचा मला सामना करावा लागला. त्यावेळी आई बदामीबेन आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर विविध अडचणींतून मार्ग काढताना अनेक अनुभव आले. त्यातून घडत गेलो. ही प्रतिकूल परिस्थिती, अडचणी खऱ्या अर्थाने मला घडविणारे गुरू आहेत.
- भूषण गांधी