हसीना फरास यांचा डिसेंबरमध्ये राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:26 AM2017-11-20T00:26:10+5:302017-11-20T00:31:55+5:30
गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर हसीना फरास यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्या ८ डिसेंबरला राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर काँग्रेसच्या गोटात महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू असून काँग्रेसतर्फे नगरसेविका दीपा मगदूम, स्वाती यवलुजे व उमा बनछोडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पण मगदूम व यवलुजे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार हे निश्चित आहे. त्यापुढील सहा महिनेही काँग्रेसचा महापौर राहणार आहे.
महापालिकेच्या सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवत सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. दोन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ २९ वर पोहोचले होते. राष्टÑवादी काँग्रेसच्या साथीने काँग्रेसने पुन्हा महापालिकेत सत्ता स्थापन केली. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर, उपमहापौरपदासह विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या वाटण्या झालेल्या आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांना महापौरपदी तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांना संधी देण्यात आली. दुसºया वर्षी राष्टÑवादीच्या हसिना फरास महापौर तर काँग्रेस अर्जुन माने उपमहापौर झाले. फरास यांचा वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने नवीन महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
महापौरपदासाठी काँग्रेसकडून दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या गोट्यात पहिल्या वर्षी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अश्विनी रामाणे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उत्तर विधानसभा मतदारसंघाला संधी मिळू शकते. त्यादृष्टीने यवलुजे यांनी प्र्रयत्न सुरू केले आहेत; पण ‘उत्तर’मधून ऋतुराज पाटील यांची चाचपणी सुरू असल्याने आता मगदूम यांना संधी देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘उत्तर’मधील नगरसेविकांना संधी देण्याची खेळी आमदार सतेज पाटील खेळू शकतात.
नवीन महापौरांना साडेचार महिनेच
विद्यमान महापौरांनी ८ डिसेंबरला राजीनामा दिला तरी नवीन निवड होण्यास किमान तीन आठवड्यांचा कालावधी जाणार आहे. साधारणत: मे महिन्यात नवीन आरक्षणानुसार सर्वसाधारण गटातील महिला महापौरपदी विराजमान होणार असल्याने आता होणाºया महापौरांना जेमतेम साडेचार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
भाजप-ताराराणीच्या सावध हालचाली
स्थायी समिती सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीने दोन्ही काँग्रेसची चांगलीच दमछाक केली होती पण ऐनवेळी शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी काँग्रेसला साथ दिल्याने डॉ. संदीप नेजदार यांनी बाजी मारली. त्यामुळे महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप-ताराराणीमध्ये सावध हालचाली सुरू झाल्या आहेत.