कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी; कडवी, कासारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नद्यांचे पाणी पात्राबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:03 PM2022-08-08T16:03:25+5:302022-08-08T16:03:59+5:30
नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे
अनिल पाटील
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील कडवी व कासारी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून आज, सोमवारीही या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कडवी धरण ९० टक्के तर कासारी धरण ८१ टक्के भरले आहे. अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
गेल्या २४ तासात दोन्ही धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. कडवी धरण क्षेत्रात १२० मि. मी. तर कासारी धरण क्षेत्रात १५८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या कडवी धरणात २. २५ टीएमसी व कासारी धरणात २. २४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याची मोठी आवक होत असून धरणातील पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
नद्यांचे पाणी पात्राबाहेर
परिणामी कडवी धरणातुन १८० क्युसेक तर कासारी धरणातुन ५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. संततधार पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे कडवी तसेच कासारी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडुन या दोन्ही नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आजअखेर कडवी धरण क्षेत्रात २१४४ मि. मी . तर कासारी धरण क्षेत्रात २७९० मि . मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.