कोल्हापूरकरांची मदत, नक्षलग्रस्तांंना दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:04 PM2018-10-16T17:04:21+5:302018-10-16T17:06:47+5:30
सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरातील तरुण मंडळांनी एक ट्रक जुने कपडे जमा केले आहेत. दिवाळीचे औचित्य साधून हे कपडे नक्षलग्रस्त भागांत पाठविण्यात येणार आहेत.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरातील तरुण मंडळांनी एक ट्रक जुने कपडे जमा केले आहेत. दिवाळीचे औचित्य साधून हे कपडे नक्षलग्रस्त भागांत पाठविण्यात येणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आज कालबाह्य होताना दिसत आहे. त्याची जागा इव्हेंटने घेतली असल्याची टीका सर्वत्र होताना दिसते. मात्र कोल्हापुरातील काही गणेशोत्सव मंडळे मात्र, याला अपवाद ठरली आहेत. विविध उपक्रमांद्वारे या मंडळांनी सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे.
व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट, अक्षय मित्र मंडळ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पुढाकार घेऊन गणेशोत्सव काळात विविध मंडळांकडे नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी जुने कपडे देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधायक उपक्रमास मंडळांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.
इतकेच नव्हे, तर त्यांनी या काळात आपल्या परिसरातून जुने कपडे जमा करण्याचे काम उत्स्फूर्तपणे सुरूही केले. काही मंडळांनी तर अनावश्यक खर्च कमी करीत या उपक्रमासाठी नवीन कपडेही खरेदी केले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम केलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कपडे योग्य ठिकाणी पोहोच करण्यात येणार आहेत.
जुन्या पण स्वच्छ कपड्यांना इस्त्री...
जमा झालेले हे ट्रकभर जुने कपडे अंबाई डिफेन्स कॉलनी येथील व्हिजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या घरी एकत्र करण्यात आले. ते स्वच्छ धुऊन त्यांना इस्त्री केल्याने अगदी नव्यासारखे दिसत आहेत. अनेकांनी चांगले कपडे दिले आहेत, तसेच अगदीच जीर्ण झालेले कपडे न पाठविता बाजूला ठेवले आहेत.
शनिवारी भव्य कार्यक्रम
या उपक्रमासाठी शहरातील अनेक गणेश मंडळांनी सहकार्य केले. शनिवारी (दि. २०) शाहूपुरी पोलीस ठाण्यात सकाळी दहा वाजता होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कपड्यांनी भरलेला ट्रक गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना करण्यात येणार आहे. या ट्रकसोबत कोल्हापुरातील युवकांचे पथकही जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात एकत्र येणारी युवकांची शक्ती विधायक कार्याकडे वळविण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला. उत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी हे जुने कपडे जमा केले आहेत.
- संताजी घोरपडे,
अध्यक्ष, व्हिजन ट्रस्ट