सत्त्याहत्तर वर्षीय नानांच्या भरतकामास सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:04 PM2017-10-13T13:04:46+5:302017-10-13T13:26:17+5:30
भरतकामविषयक मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत मूळच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या पण आता इचलकरंजीमध्ये स्थायिक असलेल्या सत्त्याहत्तर वर्षीय रामदास विठोबा काजवे उर्फ नाना यांच्या चित्राची निवड पुरस्कार विजेत्यांमध्ये होण्यामुळे एक विक्रम झाला आहे.
कोल्हापूर : वेगवेगळ्या प्रकारच्या धाग्यांची निर्मिती करणार्या अँकर या नामवंत उद्योगातर्फे आखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या अँकर आयडॉल एम्ब्रॉयडरी कॉन्टेस्ट 2017 या भरतकामविषयक मानाच्या स्पर्धेत मूळच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या पण आता इचलकरंजीमध्ये स्थायिक असलेल्या सत्त्याहत्तर वर्षीय रामदास विठोबा काजवे उर्फ नाना यांच्या चित्राची निवड पुरस्कार विजेत्यांमध्ये होण्यामुळे एक विक्रम झाला आहे.
जिव्हाजी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्षपद भूषविलेल्या काजवेंचे कलाक्षेत्रातील या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. विणकाम, भरतकाम म्हणजे स्त्रियांनी आत्मसात करण्याची कौशल्ये अशी सर्वसाधारण सामाजिक धारणा असताना पॉवरलूमचा व्यवसाय, इलेक्ट्रिक मटेरिअलचे दुकान व फर्निचरचा व्यवसाय अशा व्यवसायात आणि इचलकरंजी स्वकुळ साळी समाजाच्या संघटनात्मक कामामध्येही प्रदीर्घ काळ योगदान देणार्या नानांनी भरतकामाची ओढ लहानपणापासून जपली आहे.
एकीकडे जवळपास साठ वर्ष सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी त्याचवेळी व्यावसायिक व उद्योजक म्हणून यशस्वी वाटचाल करणार्या नानांनी भरतकामाशी आपले नाते जोडले ते चित्रकलेच्या आवडीतून. नानांचे थोरले बंधू कै. मारूती काजवे हे एक चांगले चित्रकार होते. त्यांच्यामुळे चित्रकलेची आवड निर्माण झाली तरी आपण वेगळे काहीतरी करायचे अशी नानांमध्ये खुमखुमी होती.
इयत्ता दहावीनंतर शालेय प्रवास संपला आणि परंपरागत व्यवसाय म्हणून नाना पॉवरलूमच्या व्यवसायाकडे वळले. धाग्यांशी संबंधित व्यवसाय करू लागल्यावर आपण कागद, रंग वापरून चित्रे काढण्यापेक्षा सुईधागा वापरून भरतकामातून चित्रे साकारण्याचा प्रयत्न का करू नये अशी ओढ नानांना वाटू लागली. त्यातून नानांचे भरतकामाचे प्राविण्य वाढत गेले.
हळूहळू हे प्राविण्य इतके वाढले की पाहाणार्यांना भरतकामाची चित्रे ही भरतकामाची न वाटता रंग व ब्रश यांनी काढलेली चित्रे वाटू लागली. विविध कलामहोत्सवांमध्ये नानांच्या या कलेला दाद मिळत गेली. डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यासारख्यांनीही नानांच्या कलेला दाद दिली.
अँकर या धागेनिर्मिती करणार्या उद्योगाच्या भरतकाम विषयक स्पर्धेतील विजेत्यांमध्ये नानांचे चित्र निवडले गेल्याने त्यांचा व त्यांच्या निष्ठापूर्वक जोपासलेल्या कलेचा गौरव झाला आहे व अन्य विजेत्यांसोबत पाच लाख रूपयांच्या पुरस्कारावर त्यांनी आपला हक्क प्रस्थापित केला आहे.
नानांच्या दृष्टीने पुरस्काराच्या रकमेपेक्षा आखिल भारतीय स्तरावर त्यांच्या कलेचा सन्मान होणे ही बाब महत्त्वाची आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे चित्र भरतकामातून नानांनी सहा महिन्यांच्या परिश्रमातून तयार केले होते आणि तेच याच स्पर्धेत आखिल भारतीय स्तरावर सन्मानाचे मानकरी ठरले आहे.