मी ‘महाराष्ट्र केसरी’ झालो..! -- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी-लाल माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:47 PM2018-03-24T23:47:29+5:302018-03-25T00:17:35+5:30
आता माझ्यासमोर जळगावचे अधिवेशन व ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हेच ध्येय होते. या स्पर्धेत मी मुंबई संघाकडून उतरलो. कुस्तीची अंतिम लढत निश्चित झाली आणि पाच जिल्ह्यांतील मल्लांनी महाराष्ट्र
- शब्दांकन : विश्वास पाटील
आता माझ्यासमोर जळगावचे अधिवेशन व ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हेच ध्येय होते. या स्पर्धेत मी मुंबई संघाकडून उतरलो. कुस्तीची अंतिम लढत निश्चित झाली आणि पाच जिल्ह्यांतील मल्लांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली. ‘महाराष्ट्र केसरी’साठी खेळणारा मल्ल हा महाराष्ट्राचाच असावा, असा मुद्दा त्यांनी पुढे केला. ज्या पाच जिल्ह्यांनी ही तक्रार केली, त्या जिल्ह्यांतील फारसे पैलवानही नव्हते. त्यांनी ही एका ओळीची तक्रार केली. तक्रार आल्यावर बाळासाहेब देसाई यांनी तातडीने बैठक बोलावली. त्या बैठकीस मुंबई तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले. त्या बैठकीत देसाई यांनी व्यवहार्य भूमिका मांडली. ‘हा पैलवान महाराष्ट्रातून लहानपणापासून कुस्ती खेळत आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. अनेक गटांतून लढत अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना आता कसा नकार देणार,’ अशी विचारणा देसाई यांनी केली. त्यावर त्या जिल्ह्यांनी ‘दीनानाथ कोणत्याही गटातून लढू दे, परंतु महाराष्ट्र केसरीसाठी त्यास संधी दिली जाऊ नये’ असा आक्षेप घेतला. त्या बैठकीतील एक माणूस मी जिथे थांबलो होतो तिथे आला व त्याने पैलवान तुमच्याबद्दल तक्रार झाली असल्याचे सांगितले. मी कुस्तीच्या अंतिम फेरीत आल्यावर अशी तक्रार केलेली मलाही आवडले नाही. मी कमालीचा नाराज झालो. अंगावरच्या लंगोटसह येथून काशीला निघून जाणार, असे मी त्या व्यक्तीला सांगून टाकले. बोरीबंदर-बनारस ही एक्स्प्रेस जळगावहून जाते त्यातून मी जातो व परत कोल्हापूरलाही जाणार नाही, असे सांगितले.
बाळासाहेब देसाई हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी तुम्ही दीनानाथला ‘महाराष्ट्र केसरी’साठीच मुळात प्रवेश नाकारायला हवा होता. तो चार लढती जिंकला व फायनलला आला. आता तासाभरात कुस्ती होणार आणि तुम्ही त्याला लढू देऊ नका म्हणत असाल तर ते चुकीचे आहे, मी त्यास संमती देणार नाही. काही झाले तरी दीनानाथ खेळणारच व लढत ७.३० वाजता लावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. देसाई यांच्या निर्णयक्षमतेची चुणूक त्यावेळी महाराष्ट्राने अनुभवली.
कुस्ती होणार असा निरोप मला खाशाबा जाधव यांनी येऊन सांगितला तेव्हा माझ्या डोळ्यांतून नकळत अश्रू आले. वसंतदादा यांच्यामुळे मी मुंबईतून सांगलीला आलो. देसाई यांच्यामुळे मला ‘महाराष्ट्रातील मल्ल’ अशी ओळख मिळाली. त्यांनी तिथे पाठबळ दिले नसते तर कदाचित माझा परतीचा प्रवास सुरू झाला असता, परंतु नियतीच्या मनात तसे नसावे कदाचित.
ठरल्याप्रमाणे ७.३० वाजता कुस्ती लावली. या लढतीला २० मिनिटांचा राऊंड असतो. शिवाजी विद्यापीठाचे कुस्ती प्रशिक्षक बी. टी. भोसले हे या लढतीचे मुख्य पंच होते. चंबा मुत्नाळ हा कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा पठ्ठा. पोलादाच्या बारसारखा मजबूत. लढवय्या पैलवान. माझी त्याच्यासोबत पाच वेळा लढत झाली. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला. कुस्तीत आम्ही दोघे मातीत रंगलो तर आमच्यातील चंबा कोण आणि दीनानाथ कोण हे ओळखायचे नाही इतके साम्य आमच्यात होते. फक्त माझी उंची जरा जास्त होती.
आमच्यातील ही ‘महाराष्ट्र केसरी’साठीची लढत २० मिनिटे झाली. चंबा हा रोखून कुस्ती करणारा पैलवान, त्यामुळे तो डावच करू द्यायचा नाही. ताकदीनेही तो भारी होता. प्रतिस्पर्धी पैलवानाची मान ओढून आतून चाट मारायचा. त्यामुळे विरोधी पैलवानास हबकी बसायची. ही कुस्ती अत्यंत जोरात झाली. ही लढत मी गुणांवर ३-० अशी जिंकली. कुस्ती जिंकली, ‘महाराष्ट्र केसरी’ झालो व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा झालो. दि. २२ नोव्हेंबर १९६६ चा तो दिवस. त्यावेळी मी फक्त २१ वर्षांचा होतो. माझ्यानंतर हरिश्चंद्र बिराजदार २० व्या वर्षी व युवराज पाटील हा १८ व्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ झाले.