इचलकरंजी पोलीस दलाची नामुष्की

By admin | Published: March 30, 2015 11:22 PM2015-03-30T23:22:55+5:302015-03-31T00:28:37+5:30

चोऱ्या, घरफोड्यांसह दरोडेही : गस्ती पथकासह गुन्हे शोध पथक निष्क्रिय, अनेक प्रकरणांचा तपास रखडला

The Ichalkaranji police force's negligence | इचलकरंजी पोलीस दलाची नामुष्की

इचलकरंजी पोलीस दलाची नामुष्की

Next

अतुल आंबी- इचलकरंजी - येथील दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, रात्रीच्या घरफोड्या यांसह दोन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेला साडेचार कोटींचा दरोडा यामुळे इचलकरंजीतील पोलीस दलांची चांगलीच नामुष्की झाली आहे. शहरात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा सवाल या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांची इचलकरंजीला नियुक्ती म्हणजे ‘चांगले’ पोलीस स्टेशन अशी ओळख जिल्हा पोलीस दलात होती. कारण शहरातील वस्त्रोद्योगाची आर्थिक उलाढाल मोठी असल्याने पोलिसांची पाचही बोटे तुपात, अशी परिस्थिती होती. येथील वस्त्रोद्योग व्यवसायामुळे देशातील अनेक राज्यांतून लोक येऊन राहिले आहेत. त्यामध्ये कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिकीकरणामुळे येथील प्रगती झाली असली तरी त्याबरोबर अवैध व्यवसायही वाढत गेले. शहरात खंडणी, खून, मारामाऱ्या यासह मटका, जुगार, गावठी दारू यासारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरले होते. इचलकरंजी शहरात अतिरिक्त पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय यासह दोन पोलीस स्टेशन, एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक असे सुमारे २५० पोलीस कार्यरत असतानाही तत्कालीन पोलिसांना या अवैध व्यवसायाला पसरण्यापासून थांबवणे अथवा त्यावर जरब बसविणे म्हणावे तसे कोणाला जमले नाही.
दीड वर्षांपूर्वी एस. चैतन्य हे आयपीएस अधिकारी याठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले. योगायोगाने त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पदभार रिक्त होता. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण जबाबदारी चैतन्य यांनी घेतली. कोणाचाही हस्तक्षेप होत नसल्याने कारवाईचा धडाका लावत कोणतीही तडजोड न करता येथील अवैध व्यवसाय ९० टक्के गुंडाळला.
शहराच्या इतिहासातील हा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता. येथील कामगारवर्गामुळे ९० टक्केसुद्धा अवैध व्यवसाय बंद करणे सहजासहजी शक्य नव्हते. मात्र, आयपीएस अधिकारी असल्याने गुंडांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या व्हाईट कॉलर लोकांवरही त्यांची जरब बसली आणि बघता-बघता मटका, जुगार, गावठी दारू यासह खंडणीसारखे प्रकार कमी झाले. (पूर्वार्ध)

अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास नाही
शहरातील कित्येक मोठे गुन्हे उघडकीस आले नाहीत. कृष्णकुंज बंगल्यावर पडलेला दरोडा, वाटमारी करून कोयत्याचा धाक दाखवून लुटून नेलेले लाखो रुपये यासह कित्येक सर्वसामान्यांच्या घरात झालेल्या घरफोड्या, दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातून धूम स्टाईलने चोरलेले दागिने अशा अनेक प्रकरणांचा तपास रखडला आहे.


अच्छे दिन कधी येणार?
भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या आशाही वाढल्या आहेत. सर्वच सरकारी क्षेत्रात बदल होतील, असे वाटत आहे. याचा परिणाम पोलीस दलावर कधी होणार?, पोलिसांच्या यंत्रणेत सुधारणा होऊन अच्छे दिन कधी येणार?, असे प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहेत.

Web Title: The Ichalkaranji police force's negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.