चित्रफितीद्वारे संभाजीराजेंच्या इतिहासाला उजाळा
By admin | Published: May 15, 2015 12:22 AM2015-05-15T00:22:39+5:302015-05-15T00:24:41+5:30
अठ्ठावीस मंडळांचा सहभाग : जयंतीनिमित्त अखंड जयघोषात संयुक्त संभाजीनगरने काढली मिरवणूक
कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांचा अखंड जयघोष करत, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मिरवणुकीत मोठ्या स्क्रीनवर दाखवित संयुक्त संभाजीनगरने मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
गुरुवारी सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ६ फुटी फायबर मूर्तीचे पूजन परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी जन्मकाळ साजरा करण्यात आला. याच दरम्यान संभाजीनगर, शिवाजी चौक ते रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी परिसरातील युवकांनी मोटारसायकल रॅली काढली. सायंकाळी सात वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास डिजिटल स्क्रीनद्वारे दाखविण्यात येत होता. ही स्क्रीन मिरवणूकमार्गावरील सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती चंद्रकांत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, किसन कल्याणकर, अजित कोरे, माजी नगरसेवक रवी आवळे, धनाजी घोरपडे, राजू चरापले, प्रकाश शिंदे, सुजित जाधव, तुषार देसाई, अशोक इनामदार, उत्सव कमिटी अध्यक्ष फारुख शेख, गौरव निंबाळकर, भूषण मेस्त्री, आदित्य जमदाडे, रोहन पोर्लेकर, ऋषिकेश घोरपडे, ओंकार मिठारी, ऋषिकेश शिंदे, सूरज शिंदे, महेश पाटील, रोहित माने, नितीन आंबेकर, युवराज पाटील, आदी उपस्थित होते.
संभाजीनगरातील मंडळे प्रथमच एकत्रित
मिरवणुकीची सुरुवात संभाजीनगर येथून होऊन नंगीवली चौक, लाड चौक, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कोळेकर तिकटी, शाहू बँक चौक, नंगीवली चौक ातून पुन्हा संभाजीनगर येथे रात्री उशिरा समाप्त करण्यात आली. ही जयंती साजरी करण्यासाठी संभाजीनगरातील २८ मंडळांनी प्रथमच एकत्रित येत एकजूट दाखविली.